esakal | विद्यार्थ्यांची नकार"घंटा'; नगर जिल्ह्यातील दोन हजारपैकी अवघ्या 278 शाळा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar District Out of 2000 only 278 schools started

राज्य सरकारच्या निर्देशानुसार सोमवारी जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले.

विद्यार्थ्यांची नकार"घंटा'; नगर जिल्ह्यातील दोन हजारपैकी अवघ्या 278 शाळा सुरू

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : राज्य सरकारच्या निर्देशानुसार सोमवारी जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. कोविडबाबत प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करीत, जिल्ह्यातील 278 शाळा सुरू झाल्या. 

गेल्या आठवड्यापासूनच शाळा सुरू करण्याबाबत तयारी सुरु होती. वर्गखोल्यांसह स्वच्छतागृहे, परिसर, कार्यालये सॅनिटाइझ करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याची सोय, सॅनिटायझर स्टॅंड शाळांनी ठेवले आहेत. काही शाळांनी स्व-खर्चातून विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप केले. विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग व ऑक्‍सिजन पातळी तपासण्यात आली.

जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सुमारे दोन हजार शाळा आहेत. त्यांमध्ये अंदाजे दोन लाख 84 हजार 354 विद्यार्थी आहेत. त्यांपैकी पहिल्या दिवशी फक्त 278 शाळा सुरू झाल्या. त्यात सर्वाधिक नेवाशातील 50 शाळांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ श्रीरामपूरमधील 44 शाळा उघडल्या. जिल्ह्यात सर्वांत कमी, कर्जत तालुक्‍यातील फक्त दोनच शाळा सुरू झाल्या. राज्य सरकारने, "माझे कुटुंब- माझी जबाबदारी' अभियानातून आरोग्य यंत्रणेला मास्कचे वाटप केले आहे. या अभियानातून विद्यार्थ्यांना शाळेत मास्कचे वाटप करावे, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा : उच्च अधिकारीपदावर कार्यरत असणाऱ्या तरुण- तरुणीने केले अवघ्या दोन रुपयांत लग्न
तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा
 
अकोले ः 21, जामखेड ः नऊ, कर्जत ः दोन, कोपरगाव ः सहा, महापालिका हद्द ः 36, नगर तालुका ः 24, नेवासे ः 50, पारनेर ः 19, पाथर्डी ः 18, राहाता ः आठ, राहुरी ः 15, संगमनेर ः तीन, शेवगाव ः 17, श्रीगोंदे ः सहा, श्रीरामपूर ः 44. 

अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी 
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांच्यासह विस्तार अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, जिल्ह्यातील शाळा नेमक्‍या कधी भरवायच्या, याबाबत प्रशासनाने सूचना केलेल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या त्या वेळी शाळा सुटल्याही होत्या. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ग्रामीण भागात पालक उदासीन
 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी रोज आकडा कमी-जास्त होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे समोर आले. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण त्यांना शाळेत पाठविणार नसल्याची भूमिका पालकांनी घेतली आहे. 

शाळांनीच हमीपत्र द्यावे 
मुले शाळेत पाठवीत असल्याबाबतचे पालकांचे हमीपत्र शाळा विद्यार्थ्यांकडून भरून घेत आहेत. मात्र, असे हमीपत्र देण्यासही अनेक पालकांनी विरोध दर्शविला. राज्य सरकार शाळा सुरू करण्याचा आदेश देऊन मोकळे झाले. स्थानिक प्रशासनावर जबाबदारी लोटली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न असल्यामुळे, उलट शाळेसह राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने, मुलांना कोरोनाची बाधा होणार नाही, असे हमीपत्र पालकांना द्यावे, अशी मागणी होत आहे. 

साडेसात हजार शिक्षकांची तपासणी 
जिल्ह्यातील सुमारे 16 हजार शिक्षकांपैकी आतापर्यंत 7429 शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे. त्यांतील फक्त अडीच हजार शिक्षकांचे अहवाल आले असून, उर्वरित अहवाल येणे बाकी आहेत. जिल्ह्यातील शिक्षक रोज कोरोना चाचणीसाठी केंद्रावर जातात; मात्र किट कमी पडत आहेत. काही शिक्षकांनी स्राव देऊन चार दिवस झाले तरी अहवाल आलेले नाहीत. 


कोरोना चाचणी होऊन अहवाल आलेल्या शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. अहवाल आले नसल्यास शिक्षकांनी शाळेत जाऊ नये. विद्यार्थ्यांना ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अध्यापन सुरू ठेवावे. 
- प्रताप शेळके, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद 

 
संपादन : अशोक मुरुमकर

loading image