
लग्न म्हटले, की डामडौल, हुंडा, बॅंडबाजा नि वऱ्हाडी मंडळींची गर्दी. त्यांची सरबराई करण्यात गुंतलेले वधू-वर पिता. रुसवे-फुगवे नि पैशांचा महापूर.. दिखाऊपणाच्या या फॅडमुळे, खोट्या प्रतिष्ठेपायी सर्वसामान्य कुटुंबांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले.
अहमदनगर : लग्न म्हटले, की डामडौल, हुंडा, बॅंडबाजा नि वऱ्हाडी मंडळींची गर्दी. त्यांची सरबराई करण्यात गुंतलेले वधू-वर पिता. रुसवे-फुगवे नि पैशांचा महापूर.. दिखाऊपणाच्या या फॅडमुळे, खोट्या प्रतिष्ठेपायी सर्वसामान्य कुटुंबांवर कर्जाचे डोंगर उभे राहिले. त्यातून सावरता- सावरता अनेकांची आयुष्ये सरली. असा हा फुकाचा मोठेपणा टाळून उच्च अधिकारीपदावर कार्यरत असणारे तरुण-तरुणी अवघ्या दोन रुपयांत विवाहबंधनातून एक झाले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून भारतीय वनसेवेत (आयएफएस) अधिकारी असणारे चिखली (ता. श्रीगोंदे) येथील चंद्रशेखर शंकरसिंग परदेशी व चलबुर्गा (ता. औसा, जि. लातूर) येथील राज्य करनिरीक्षक शुभाली लक्ष्मीकांत परिहार, अशी या दाम्पत्याची नावे. आयएफएस चंद्रशेखर परदेशी एकत्र कुटुंबातच वाढले. त्यांचे वडील शंकरसिंग परदेशी प्रगतिशील शेतकरी. एसटीआय शुभाली या लक्ष्मीकांत परिहार यांच्या कन्या. विशेष म्हणजे, त्यांच्या गावातील त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
साध्या पद्धतीने, कमी खर्चात लग्ने व्हावीत, यासाठी परदेशी व परिहार कुटुंबांसह या उच्च अधिकारीपदावरील जोडप्याने रजिस्टर पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अवघ्या दोन रुपयांत ते आज विवाहबद्ध झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबांतील मोजक्याच व्यक्ती उपस्थित होत्या.
जेवढे मोठे लग्न, तेवढी मोठी प्रतिष्ठा, असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे. त्यामुळे बरेच लोक लग्नात अमाप खर्च करतात. खोट्या प्रतिष्ठेपायी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर त्यातून कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्याचा परिणाम परिवारातील अन्य मुला-मुलींच्या शिक्षणावर होतो. लग्नातील अवाजवी खर्च टाळून तो मुलींच्या शिक्षणावर केला, तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, असा संदेश या जोडप्याने समाजाला दिला. तसेच, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनीही अशाच पद्धतीने विवाह केल्यास त्यातून वाचलेला पैसा सामाजिक कार्यात खर्च करता येईल. भविष्यात नोकरी करतानाच मुलींच्या शिक्षणासाठी मोठे काम उभे करण्याचा नवदाम्पत्याचा मानस आहे.
आयएफएस अधिकारी चंद्रशेखर परदेशी म्हणाले, लहानपणापासून अनेक शेतकऱ्यांना मुलींच्या लग्नासाठी शेतजमीन, बैलजोडी विकताना पाहिले आहे. त्यामुळे कमी खर्चात लग्न करून जनजागृती करण्याची इच्छा होती. या कार्यात दोन्ही कुटुंबीयांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले.
राज्य करनिरीक्षक शुभाली परिहार-परदेशी म्हणाल्या, आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे अनेक अडचणींवर मात करून मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकले. त्याचप्रमाणे, प्रत्येक पालकाने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावे.
संपादन : अशोक मुरुमकर