‘पारनेर’ची प्रारूप यादी जाहीर; २६ नोव्हेंबरअखेर हरकती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पारनेर’ची प्रारूप यादी जाहीर; २६ नोव्हेंबरअखेर हरकती

‘पारनेर’ची प्रारूप यादी जाहीर; २६ नोव्हेंबरअखेर हरकती

पारनेर : पारनेर नगरपंचायतीची प्रारूप यादी आज (ता. २३) जाहीर करण्यात आली. त्यावर २६ नोव्हेंबरअखेर हरकती मागविण्यात आल्या आहेत. या हरकतींचे निराकरण करून २९ नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी, तर ३० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यात कोणत्याही क्षणी पारनेर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारनेरचे राजकारण तापू लागले आहे.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

पारनेर नगरपंचायतीची मुदत संपली होती, त्या नंतर आरक्षणाबरोबरच प्रारूप मतदार याद्याही जाहीर झाल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे नगरपंचायतीची निवडणूक लांबणीवर पडली होती. आज पुन्हा प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर दोन दिवसात हरकती मागविण्यात आल्या आहेत. २९ला प्रभागनिहाय तर ३० नोव्हेंबरला केंद्रनिहाय मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात कोणत्याही क्षणी नगरपंचायतीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी आपापल्या पक्षांच्या नेत्यांचे उंबरे झिजविण्यास सुरवात केली आहे. वेगवेगळ्या प्रकारे आडाखे टाकून उमेदवारी आपल्याच पदरात कशी पडेल, या साठी अनेक जण तयारीला लागले आहेत. अनेकांनी आपापल्या प्रभागात मतदारांच्या गाठीभेटींना सुरवात केली आहे. या पूर्वी निवडणूक लवकरच होणार या अपेक्षेने विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांनी मागील व नुकत्याच संपलेल्या दिवाळीत मिठाईसह भेटवस्तूंचे मतदारांना वाटप केले.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

अनेक इच्छुकांनी मागील दिवाळी सणाच्या वेळीच मिठाई वाटली. मात्र, निवडणूक लांबल्याने त्यांच्या पदरी निराशा आली होती. त्यांचा मिठाईचा खर्च फुकट गेल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्या नंतर नुकत्याच संपलेल्या दिवाळीतसुद्धा अनेकांनी मिठाईसह भेट वस्तूंचे वाटप केले. पुन्हा एकदा आरक्षणात बदल झाला. पुन्हा आरक्षण निघाल्याने काहींचा हिरमोडही झाला आहे.

असे झाले राजकारण

नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही दुसरीच निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीत अपक्षांच्या मदतीने माजी आमदार विजय औटी यांनी सत्ता स्थापन करून नगराध्यक्षपद मिळविले होते. अडीच वर्षांनंतर मात्र, अपक्ष नगरसेवक वर्षा नगरे यांनी शिवसेनेला म्हणजेच औटी यांना धक्का देत, नगरसेवकांमध्ये फोडाफोडी करून नगराध्यक्षपद पटाकाविले होते. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा नगरे यांनी औटी यांच्याशी हातमिळवणी करीत पद टिकविले होते. सध्या मात्र नगरपंचायतीवर प्रशासक आहे.

loading image
go to top