महाराष्ट्रात हा जिल्हा आहे सर्वात मोठा, आकाराने अन साखर कारखानदारीतही

सुस्मिता वडतिले
Saturday, 6 June 2020

भारताच्या एकूण साखर उत्पादनापैंकी जवळजवळ ५६ टक्के साखर उत्पादन एकट्या महाराष्ट्र सहकारी साखर कारखानदारीमुळे होते. गोदावरी व भीमा या जिल्हयातील प्रमुख नद्या आहेत. २०११च्या जनगणनेनुसार जिल्हयाची एकूण लोकसंख्या ४५ लाख ४३ हजार १५९ आहे

नगर - महाराष्ट्र हा चोहोबाजूंनी वेगवेगळ्या संपदेने नटलेला आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची वेगवेगळी अशी वैशिष्ट्य आहे.  प्रत्येक जिल्ह्याने आपली स्वत:ची ओळख निर्माण केलेली आहे. त्यातील एक जिल्हा म्हणजे अहमदनगर. महाराष्ट्र राज्याच्या साखरेच्या उत्पादन एकटया अहमदनगर जिल्हयाचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात एकूण १७४ साखर कारखाने आहेत. त्यातील अहमदनगर जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे.  

सहकारातून ग्रामोध्दार व संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला आहे. क्षेञफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेला हा जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य हे भारताचे शर्कराकुंभ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात केवळ ११ टक्केच जमिनीवरच पाणीपुरवठा होतो. परंतु या अडचणीवर मात करुन देशातील साखर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने आघाडीवर राहून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

हेही वाचा - अकबराच्या दरबारात बिरबलापेक्षा हा होता विद्वान

भारताच्या एकूण साखर उत्पादनापैंकी जवळजवळ ५६ टक्के साखर उत्पादन एकट्या महाराष्ट्र सहकारी साखर कारखानदारीमुळे होते. गोदावरी व भीमा या जिल्हयातील प्रमुख नद्या आहेत. २०११च्या जनगणनेनुसार जिल्हयाची एकूण लोकसंख्या ४५ लाख ४३ हजार १५९ आहे. उद्योग क्षेत्रात अहमदनगर जिल्हा प्रगतिपथावर आहे. अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्हा हा सर्वांत पुढारलेला जिल्हा आहे. अहमदनगर जिल्ह्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अहमदनगर जिल्हयाची अन्नधान्याची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.मात्र, ताज्या अाकडेवारीनुसार सोलापूर जिल्हा साखर कारखानदारीत पुढे गेला आहे.

विशेष
अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला आणि सर्वाधिक सहकारी साखर कारखाने असलेला राज्यातील जिल्हयाची वैशिष्ट्ये दिमाखाने मिरवत आहे. अहमदनगर राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २३ साखर कारखाने आहेत. त्यात नऊ कारखाने हे खासगी आहेत. सहकारी चळवळीचे जन्मस्थान आहे.प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना काढला. साखर, दूध आणि बँक सहकारी संस्था येथे भरभराट करतात.  

येथील तालुके
अहमदनगर जिल्ह्यात अकोले कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा,  श्रीरामपूर, संगमनेर हे तालुके जिल्ह्याच्या विविधेत भर घालतात. 

शेती
ऊस आणि ज्वारी हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. अलिकडे कापूस हेही मुख्य नगदी पीक बनले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या जास्त आहे.  जिल्ह्यातील शेवंतीची फुलेही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. राज्याबाहेरही शेवंतीला मागणी असते. 

वेगळेपण
श्री साईबाबांची शिर्डी व अवतार मेहेरबाबांचे मेहराबाद ही अहमदनगर जिल्हयातील धार्मिक स्थळे ही भारतातील नव्हे तर जगातील अनेक भक्तांची श्रध्दास्थाने आहेत. या शिवाय श्री ज्ञानेश्वर मंदिर (नेवासा), श्री शनी शिंगणापूर, श्री दत्त मंदिर (देवगड) व चौंडी ( पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान), हजारो भाविकांचे श्रद्धास्थान भगवानगड (पाथर्डी) व सिध्दीविनायकाचे सिध्दटेक या तीर्थक्षेञांनी भाविकांच्या मनात अहमदनगर जिल्हयाचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar district is a sugar depot