Ahmednagar Fire : ‘सीएस’च्या जामिनावर उद्या सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar Fire

Ahmednagar Fire : ‘सीएस’च्या जामिनावर उद्या सुनावणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी (ता. २५) सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख गिरीश जाधव यांच्या हस्तक्षेप अर्जावर याच वेळी निर्णय दिला जाणार आहे. अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. डॉ. पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. या जामीन अर्जामध्ये शिवसेनेचे उपशहरप्रमुख गिरीश जाधव यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

या अर्जात नमूद केले आहे, की जिल्हा शासकीय रुग्णालयास वीज वितरण कंपनीच्या नालेगाव उपकेंद्रातून ११ केव्ही क्षमतेची विशेष वीजवाहिनी आणली आहे. या वाहिनीतून तारकपूर भागातील एका रुग्णालयास वीजजोडणी दिली आहे. या वीजजोडणीबाबत १८ ऑक्‍टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयास दिलेल्या वीजजोडणीला आक्षेप घेतला होता. त्यामुळे जामीन अर्जात आपल्याला म्हणणे सादर करण्यास परवानगी द्यावी, असे म्हणणे जाधव यांच्या वतीने ॲड. अभिजित पुप्पाल यांनी सादर केले. सरकारच्या वतीने ॲड. अनिल ढगे यांनी या अर्जास आक्षेप घेतला. जाधव हे या प्रकरणात त्रयस्थ व्यक्‍ती आहेत. रुग्णालयातील मृत व्यक्‍ती किंवा जखमींचे ते नातेवाईक नाहीत. सरकारी पक्ष या प्रकरणात म्हणणे सादर करण्यास सक्षम आहे. डॉ. पोखरणा यांच्या वतीने ॲड. पी. डी. कोठारी यांनी या म्हणण्यास दुजोरा दिला. जाधव यांच्या अर्जावरील निर्णयही गुरुवारी होणार आहे.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

डॉ. पोखरणा यांना अटकपूर्व जामीन कायम करण्याच्या मुद्द्यावर म्हणणे सादर करण्यास तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सात दिवसांची मुदतवाढ मागितली. वीज वितरण कंपनीकडून जिल्हा रुग्णालयातील वीजजोडणी, अहवालाबाबत कोणतेही म्हणणे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे सात दिवसांची मुदत मागण्यात आली. न्यायालयाने अशी मुदत देण्यास नकार दिला. दोन दिवसांत म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला.

डॉ. सुरेश ढाकणे यांचाही जामीन अर्ज

जिल्हा रुग्णालयातील डॉ. सुरेश ढाकणे यांनीही अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरही आता गुरुवारीच सुनावणी होणार आहे.

loading image
go to top