अहमदनगर : कचरा डेपो, पर्यटनाचे नवे ‘डेस्टिनेशन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garbage Depot

अहमदनगर : कचरा डेपो,पर्यटनाचे नवे ‘डेस्टिनेशन’

राहुरी: एखाद्या कचराकुंडीजवळून जाताना तीव्र दुर्गंधीने श्वास कोंडतो. साऱ्या शहराचा कचरा गोळा केलेल्या कचरा डेपोत फेरफटका मारण्याची कल्पनासुद्धा त्यामुळे अंगावर शहारे आणणारी वाटते. परंतु, राहुरी नगरपरिषदेच्या कचरा डेपोत तब्बल दोनशे महिलांनी फेरफटका मारून, स्नेहभोजनाचा आनंद लुटला. हजारो वृक्षराजींनी नटलेला निसर्गरम्य, स्वच्छ परिसराने ही किमया घडली.

राहुरी नगरपरिषदेतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा प्रारंभ कचरा डेपोच्या सफरीने झाला. घंटागाडीत ओला, सुका कचरा विलगीकरण करून टाकल्यावर पुढे त्याचे काय होते, या प्रश्नाचे उत्तर महिलांना मिळाले. घनकचरा व्यवस्थापनात कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मितीप्रक्रिया महिलांनी उत्सुकतेने पाहिली. जमिनीला आवश्यक सेंद्रिय कर्बोदके, सूक्ष्म घटकांनी परिपूर्ण दर्जेदार खताचा वानवळा घराच्या परस बागेला मिळाल्याने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महिलांसाठी घेतलेल्या सायकल स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी खासदार प्रसाद तनपुरे, मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिन बांगर, माजी नगराध्यक्ष डॉ. ऊषा तनपुरे यांच्या हस्ते झाले.

"पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर, परिसर स्वच्छता, या विषयावर माजी खासदार तनपुरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. डॉ. अरुणा भंडारी यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बहेनजी, शहरातील सर्व महिला मंडळांच्या पदाधिकारी, स्वच्छता विभाग प्रमुख राजेंद्र पवार, योगेश शिंदे उपस्थित होते. अप्पासाहेब तनपुरे यांनी आभार मानले.

राहुरी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या प्रश्नावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी २५ वर्षांपूर्वी दूरदृष्टीने पालिकेला शहराबाहेर कचरा डेपोसाठी २१ एकर जमीन उपलब्ध करून दिली. तीन हजार वृक्षांची लागवड केली. कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प सुरू केला. त्यामुळे कचऱ्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला.

- अनिल कासार, माजी नगराध्यक्ष, राहुरी.

Web Title: Ahmednagar Garbage Depot New Tourism Destination

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top