अहमदनगर : इमामपूर घाट परिसराला पर्यटनाचा साज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar

अहमदनगर : इमामपूर घाट परिसराला पर्यटनाचा साज

अहमदनगर : पावसाळा सुरू झाला, की पर्यटकांची पावले वळतात भंडारदरा अन् माळशेज घाटाकडे. मात्र धबधब्यांचा, निसर्गाच्या विविध विभ्रमांचा आनंद नगर शहराजवळील इमामपूर घाटातही घेता येऊ शकतो. या परिसरात अनेक छोटे-मोठे धबधबे आहेत. मात्र, बहुतांश पर्यटक आणि नगरकरांनाही ते स्पॉट माहिती नाहीत.

औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीच्या पुलाजवळील इमामपूर घाट परिसर धबधबे, डोंगर-दऱ्यांनी नटलेला आहे. जवळच पांढरीच्या पुलाजवळील भेळही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथे गर्दीही असते. हा घाट माळशेज घाटाइतका मोठा नसला, तरी परिसरातील निसर्ग, डोंगर, सुंदर व्हॅली पर्यटकास प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही.

घाट परिसरात माळशेज घाटाच्या धर्तीवर रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या सुरक्षित जागेत बसण्याची, उंच उंच डोंगर पाहत वातावरणाचा आनंद घेण्याची व्यवस्था केल्यास घाटाचे सौंदर्य अधिक वाढेल. या मार्गावरून ये-जा करणारे प्रवासी येथील निसर्ग डोळ्यांत साचवीत घटकाभर थांबतातच.

या परिसरात पर्यटकांसाठी, प्रवाशांसाठी हॉटेल्सची सुविधा आहे. प्रशासनाने कलात्मक दृष्टीचा अवलंब करीत घाट परिसर सुशोभित केल्यास इथे पर्यटकांचा राबता वाढेल.

केल्याने देशाटन

पंडित-मैत्री सभेत संचार

शास्त्र लोक-विलोकन

मनुजा चातुर्य येतसे फार

हा प्रसिद्ध श्लोक आहे. देशाटन, पर्यटन केल्यास मनुष्य समृद्ध होतो. माणसाच्या अंगी चातुर्य येते. संत-महंतांनी निसर्गाची महती पोथ्या-पुराणांमध्ये वर्णन केली आहे. त्यावर अभंग रचले आहेत. चरैवेति चरैवेति... चालत राहा असा संदेश अनेक श्लोक-ओव्यांमधून दिला आहे. एकंदरीत, पर्यटनास चालना देण्याची भूमिका पुराणकाळापासून आहे. ती या काळातही लागू पडते.

या घाटाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास हा भाग ऐतिहासिक, निसर्ग पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र ठरू शकतो. तसे झाल्यास स्थानिकांना मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो. या परिसराच्या पर्यटन विकासासाठी आर्थिक निधी मंजूर करावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित विभागातील अधिकारी सकारात्मक आहेत.

- जयंत येलूलकर, अध्यक्ष, रसिक ग्रुप व माजी नगरसेवक