Leopard attack : आईच्या कुशीतील चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Attack

Leopard attack : आईच्या कुशीतील चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला

संगमनेर : आई वडिलांच्या कुशीत कोपीत झोपलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरात घडली. वीरु अजय पवार (वय ३) असे त्याचे नाव आहे. धडपडीच्या आवाजामुळे जाग आलेल्या आई वडिलांसह इतरांनी धाडसाने पाठलाग करुन त्याची बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली. या हल्ल्यात हनुवटीच्या खाली मानेवर दाताच्या जखमा झाल्याने मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात लक्ष्मीमाता मंदिराजवळ संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी जळगाववरुन आलेल्या मजुरांच्या २० कुटुंबाची तात्पुरती वस्ती वसली आहे. गुरुवारी रात्री मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बिबट्याने वीरुवर भक्ष्य समजून हल्ला केला.

त्याच्या मानेला धरुन ओढीत नेताना त्याने केलेला आरडा-ओरडा व धडपडीच्या आवाजाने जाग आलेल्या मजुरांनी दीडशे फुटांपर्यंत पाठलाग करुन, त्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. त्याला उपचारासाठी तातडीने लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला पहाटे नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील व थोरात कारखान्याचे संचालक गणपतराव सांगळे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पहाणी करीत त्या कुटूंबाला दिलासा दिला.

संगमनेर वनविभाग ३ चे वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे, वनपाल सुहास उपासनी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. तसेच नगर येथे उपचार सुरु असलेल्या विरु व त्याच्या पालकांची भेट घेतली असून, जखमी बालक उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती सांगळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.