अहमदनगर : राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला ६९ पदके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yoga

अहमदनगर : राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राला ६९ पदके

अहमदनगर (संगमनेर) ः राष्ट्रीय योगासन स्पोर्ट्‌स फेडरेशन व ओडिशा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने भुवनेश्वर येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राने सुरवातीपासून दबदबा निर्माण करून ४४ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई केली. तसेच चॅम्पियनशिपचा किताबही पटकावला. यातून राज्याच्या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेचा मार्ग प्रशस्त केला आहे. या स्पर्धेत ३० राज्यांतील साडेपाचशेपेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग होता. तमिळनाडूच्या संघाने दुसरे, तर पश्चिम बंगालसह हरियाना संघाने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळवले.

या स्पर्धेतील सब-ज्युनिअर मुलींच्या गटात पारंपरिक योगासन, एकेरी व दुहेरी कलात्मक प्रकारात राज्याचे खेळाडू चमकले. योगासनांच्या सांघिक सादरीकरणातही महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण कामगिरी करताना कलात्मक श्रेणीतील मुलींच्या सब-ज्युनिअर संघातील तृप्ती डोंगरे, देवांशी वाकळे, युगांका राजम, वैदेही मयेकर व प्रांजल वन्ना यांनी, तर मुलांच्या गटात निबोध पाटील, आर्यन खरात, श्रुमल बाणाईत, अंश मयेकर व स्वराज फिसके यांच्या संघाने सुवर्णपदक मिळविले. याशिवाय मुलींच्या ज्युनिअर गटात मृणाली बाणाईत, सेजल सुतार, स्वरा गुजर, रुद्राक्षी भावे व तन्वी रेडीज यांनी, तर मुलांच्या गटात जय कालेकर, रूपेश सांगे, प्रीत बोरकर, ओम राजभर व सुमित बंडाळे यांच्या संघाने स्पर्धेवर वर्चस्व निर्माण करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. स्पर्धेत देशभरातील ३० राज्यांचे ५६० खेळाडू सहभागी झाले होते.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

यावेळी ओडिशा हॉकी कौन्सिलचे अध्यक्ष पद्मश्री दिलीप तिरके यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे अध्यक्ष उदित शेठ, सरचिटणीस डॉ. जयदीप आर्य, फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, नीरंजन मूर्ती, स्पर्धा निर्देशक उमंग डॉन, संयोजक सी. के. पुरोहित, केआयआयटी विद्यापीठाच्या डॉ. सस्मिता सामंता आदी उपस्थित होते.

‘ध्रुव’च्या खेळाडूंनी केले नेतृत्व

योगासनास खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर आयोजित या पहिल्याच स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणाऱ्या २५ खेळाडूंपैकी २० खेळाडू संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी होते. योगासनांचे प्रशिक्षक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षे एकही सुटी न घेता या दररोज सहा तास या खेळाडूंनी सराव केला होता. त्यांना मालपाणी फाउंडेशनकडून विशेष शिष्यवृत्तीही दिली जाते.

loading image
go to top