अहमदनगर : जिल्हा रुग्णालय जळीतकांडात वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar fire

अहमदनगर : जिल्हा रुग्णालय जळीतकांडात वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना कोठडी

अहमदनगर : जिल्हा रूग्णालयातील जळीतकांड प्रकरणी एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे. या चौघींची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला शनिवारी (ता. 6) आग लागली होती. या दुर्घटनेत 11 रूग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्वतः ही कारवाई केली. तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रिजवान अहमद मुजावर यांनी सरकारच्या वतीने फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी प्रारंभी तपास केला. त्यानंतर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना मंगळवारी (ता.9) अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना शुक्रवार (ता.12) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर या चौघींना हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. आरोपींच्या वतीने ऍड. महेश तवले, ऍड. संजय दुशिंग, ऍड. विक्रम शिंदे आणि ऍड. नीलेश देशमुख यांनी युक्‍तीवाद केला. आग लागली या दुघर्टनेशी डॉक्‍टर आणि परिचारिकांचा कोणताही संबंध नाही, असा बचाव करण्यात आला. त्यामुळे जामीन द्यावा, असे म्हणणे सादर केले.

या गुन्ह्यात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाबद्दल भादंवि कलम 304 हे लावले आहेत. या कलमातील तरतुदीनुसार जामीन देण्याचा अधिकारी जिल्हा सत्र न्यायालयास आहे, असे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद करून जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे या चौघींची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top