
अहमदनगर : आमदारांमुळे विकासाला चालना
अहमदनगर : प्रभाग एकमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. आमदार संग्राम जगताप विकासाला चालना देणारे नेतृत्व आहे. ते सर्वांना बरोबर घेऊन विकासकामांबाबतचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहेत, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी दिली. सावेडी उपनगरातील कॉटेज कॉर्नर येथे नव्याने तयार केलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाची पाहणी केल्यानंतर, स्थानिक नागरिकांनी नवीन कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, निवृत्त पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गायकवाड, विजय रोकडे, विकास जोगदंड, श्याम जाधव, भाऊसाहेब दहिफळे, दिलीप शिंदे, श्रीकांत अंकाराम, ज्ञानदेव म्हस्के, गजानन सातव, दत्तात्रय भराडे आदी उपस्थित होते.
बारस्कर म्हणाले, की प्रभाग एकमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाली आहे. या रोपांच्या संरक्षणासाठी ट्री-गार्डही बसविलेले आहेत. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची कामेही मार्गी लावली आहेत. तसेच, एलईडी दिवे बसविले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रभाग प्रकाशमान झाला आहे. उद्यानाचीही दुरुस्ती केली आहे, त्यातील झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करू. इतर ओपन स्पेसमध्ये लहान मुलांना खेळण्याचे साहित्य बसविलेले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी येथे नाना-नानी पार्क विकसित करीत आहोत. येथील कमी दाबाने मिळणाऱ्या पाण्याचा व विजेचा प्रश्न सोडविला आहे. रस्ते व परिसराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. यापुढे स्वच्छता निरीक्षक स्वत: प्रभागात लक्ष घालतील. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही प्रश्न असल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क करावा. प्रभागातील विकासकामांसाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही बारस्कर यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते नितीन बारस्कर म्हणाले, की मतदार नोंदणी अभियान सुरू असून, नागरिकांनी दुरुस्त्या किंवा नवीन नावे मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावीत.
Web Title: Ahmednagar Mla Drive Development Inspection Various Works
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..