Ahmednagar News : महापालिका हद्दीत जनावरांच्या गोठ्यांना बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar News

Ahmednagar News: महापालिका हद्दीत जनावरांच्या गोठ्यांना बंदी

अहमदनगर : महापालिका हद्दीत जनावरांच्या गोठ्यांना बंदी असतानाही शहरात राजरोसपणे म्हशींचे तीनशेपेक्षा अधिक गोठे उभारण्यात आले आहेत. या गोठ्यांतील म्हशी सकाळी आणि सायंकाळी दररोज शहरातील रस्ते अडवतात. या म्हशींमुळे अनेकांचे अपघात झाले असून, काहींना जीवदेखील गमवावा लागला आहे. महापालिका प्रशासन मात्र या अनधिकृत गोठ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

नगरकर आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांनी त्रस्त आहेत. त्यात रस्त्यावरून जाणारे म्हशींचे कळप रोज वाहनचालकांचा रस्ता अडवत आहेत. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात गायी- म्हशींचे गोठे उभारण्यास मनाई आहे. मात्र, महापालिकेने दीड वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात जागोजागी उभारलेले तीनशेपेक्षा अधिक गोठे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गोठ्यांमधील म्हशी रोज शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवरून चरण्यासाठी निघतात. सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वच रस्त्यांवर मोठी वाहतूक असते. याच वेळी म्हशींचे कळप रस्त्यावर येतात.(Ahmednagar News)

एका कळपात कमीत कमी १५ ते २० म्हशी असतात. शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, तसेच रस्त्यांवरून जाणाऱ्या रुग्णवाहिकांनादेखील या म्हशींच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. म्हशींमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. काहींना जीवदेखील गमवावा लागला. नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या.

मात्र, प्रशासनाने आतापर्यंत एकाही अनधिकृत गोठामालकावर कारवाई केली नाही. गोठ्यांमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नदेखील निर्माण झाला आहे. तक्रारी करूनही वर्षानुवर्षांपासून हे गोठे जागेवर उभे आहेत. त्यामुळे नागरिक महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

जनावरे रस्त्यावर येत असल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात होतात. संबंधित गोठामालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आमच्याकडे फिर्याद देणे गरजेचे आहे. मात्र, महापालिकेने आतापर्यंत तशी कोणतीही फिर्याद दिली नाही. फिर्याद दिल्यास आम्ही तत्काळ कारवाई करू.

- अनिल कातकडे, पोलिस उपअधीक्षक

महापालिका हद्दीत असलेल्या जनावरांच्या अनधिकृत गोठ्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी येतात. त्याबाबत नुकतीच आयुक्तांनी बैठक घेतली आहे. हे गोठे कायमस्वरूपी हटविण्यासाठी लवकरच आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येईल.

- आशिष हंस, कोंडवाडा विभागप्रमुख

मोकाट जनावरांचाही त्रास

पाळलेल्या म्हशींप्रमाणेच नागरिकांना मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचाही त्रास सहन करावा लागतो. मोकाट जनावरे भर रस्त्यात ठाण मांडून बसतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. मोकाट कुत्र्यांची दहशतदेखील शहरात कायम आहे. कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांना चावे घेतले. त्यातही काहींचा जीव गेला आहे.