अहमदनगर : पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

अहमदनगर : पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश

अहमदनगर : उपनगरांमधील पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. बोल्हेगाव-नागापूर भागातील महिलांनी बुधवारी (ता. २९) महानगरपालिका कार्यालयात आंदोलन केले. गेल्या काही महिन्यांपासून विस्कळित झालेला पाणीपुरवठा दहा दिवसांत सुरळीत न झाल्यास विळद पंपिंग स्टेशनचा ताबा घेऊन संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करू, असा इशारा यावेळी आंदोलकांसह स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांनी दिला.

केडगावसह, नागापूर- बोल्हेगाव, मुकुंदनगर या उपनगरांमधील पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होत आहे. परिणामी, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. आठ दिवसांनंतर होणारा पाणीपुरवठा, त्यातही गढूळ व कमी दाबाने मिळणारे पाणी, यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. बोल्हेगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक ७ मधील गणेश पार्क, गणेश चौक, राघवेंद्र नगर, ओम साई विहार, साईराज नगर, शिवाजीनगर, चिंतामणी रो- हाउसिंग, चोभे रो-हाउसिंग रोड आदी भागाचा पाणीपुरवठा सहा-सात महिन्यांपासून विस्कळित आहे.

महिलांना पाण्यासाठी भटकंती करावे लागते. महानगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही येथील पाणीप्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त यशवंत डांगे यांच्या दालनात आंदोलन केले. दहा दिवसांत आमचा पाणीप्रश्न सुटला नाही, तर आम्ही शहरालादेखील पाणीपुरवठा होऊ देणार नाही, त्यासाठी विळद पंपिंग स्टेशनचा ताबा घेणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

नागरिकांच्या रोषाला आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. वारंवार निवेदने देऊन व आंदोलने करूनही पाणीप्रश्न सुटला नाही. आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही. येत्या दहा दिवसांत आमचा पाणीप्रश्न सुटला नाही, तर आम्ही विळद पंपिंग स्टेशनचा ताबा घेऊन शहराचे पाणीदेखील बंद करणार आहोत.

- कुमारसिंह वाकळे, सभापती, स्थायी समिती

सहा-सात महिन्यांपासून आम्हाला पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. त्यामुळे टँकरने पाणी घ्यावे लागते. एका टँकरसाठी सातशे ते आठशे रुपये खर्च करावे लागत आहेत. पाणीपट्टी भरा मग पाणीप्रश्न सुटेल, असे मनपाचे अधिकारी असतात. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन पाणीपट्टीदेखील भरली, तरीदेखील आमचा पाणीप्रश्न सुटला नाही.

- सुभाष धामणे, नागरिक बोल्हेगाव

Web Title: Ahmednagar Municipal Corporation Citizens Cry Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top