
अहमदनगर : प्रभागातील कामे सांगण्यासाठी महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना फोन केला, तर ते आमचा कॉल रेकॉर्ड करतात, असा गंभीर आरोप स्थायी समितीच्या सभेत महिला सदस्यांनी केला. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने समज द्या, असा आदेश सभापती कुमारसिंह वाकळे यांनी दिला.
महापालिकेच्या सभागृहात सोमवारी (ता. २१) दुपारी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. याप्रसंगी नगरसचिव एस. बी. तडवी, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, यशवंत डांगे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी नगरसेवक उमेश कवडे यांनी सभेच्या सुरवातीलाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध नोंदविला. सभेला सुरवात झाल्यानंतर प्रभागांमधील नागरीपान समस्यांबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. वंदना ताठे यांनी प्रभागातील पाणीप्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रभागात इतर अनेक समस्या आहेत. त्याकडे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
प्रभागातील कामे सांगण्यासाठी कर्मचाऱ्यांना फोन केला तर ते आमचा कॉल रेकॉर्ड करत असल्याचा गंभीर आरोप ताठे यांनी केला. हा प्रकार गंभीर असून, तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी इतर सदस्यांनी केली. संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना सभापती वाकळे यांनी दिल्या. त्यावर उपायुक्त डांगे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी नगरसेवकांशी सौजन्याने वागण्याबाबतचे परिपत्रक काढण्याचे आदेशदेखील डांगे यांनी दिले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती कधी?
महापालिकेत कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी आहे. त्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वेगवेगळ्या विभागांत महिनाभरापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, त्यांना अद्याप नियुक्ती का देण्यात आली नाही? नियुक्ती देण्यास विलंब व्हायला हा काय भारत- पाकिस्तान करार आहे का, असा जाब सभापती वाकळे यांनी उपस्थित केला.
ड्रेनेजची झाकणे चोरीला
प्रभागांमधील ड्रेनेजवर झाकणे नाहीत. ही झाकणे चोरीला गेली आहेत, त्यांचा तपास करा, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली. मात्र, असा काही प्रकार झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका ड्रेनेजच्या झाकणाची किंमत सुमारे सात हजार रुपये आहे. त्यामुळे ही झाकणे चोरीला जातात. त्यांचा शोध घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशा सूचना सभापती वाकळे यांनी दिल्या.
सभेतील मंजूर विषय
झेंडी गेट येथील शाळा क्रमांक ४ च्या सभागृहाची जागा प्रबोधन फाउंडेशनला १९ हजार रुपये दरमहा भाडेतत्त्वावर देणे
ड्रेनेज व चेंबर दुरुस्तीसाठी निविदा
बोल्हेगावातील गणेश चौक ते केशव कॉर्नरपर्यंतच्या नवीन रस्त्याच्या कामास मंजुरी
केडगावातील भैरवनाथ पतसंस्था ते शाहूनगर बसस्थानकापर्यंतच्या नवीन रस्त्याच्या कामास मंजुरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.