नगरकरांसाठी खुशखबर, महापालिकेने घेतला शास्तीमाफीचा निर्णय

अमित आवारी
Tuesday, 3 November 2020

शास्तीमाफी महिनाभर दिली जाणार आहे. या काळातील दिवाळी सणादरम्यानही मालमत्ताकर भरता येणार आहे.

नगर ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर मालमत्ताकराच्या थकबाकीवरील शास्ती (करावरील दंड) माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 75 टक्‍के शास्तीमाफी दिली जाणार आहे. परंतु हा निर्णय महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेत झालेल्या महापालिका आयुक्‍त व अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केला. निर्णय जाहीर होताच महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांतील वसुली विभागांत कर भरण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. 

पत्रकार परिषदेला उपमहापौर मालन ढोणे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक रवींद्र बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, उपायुक्‍त संतोष लांडगे आदी उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेच्या अंदाजपत्रकी सभेत सर्वच नगरसेवकांनी शास्तीमाफीची मागणी केली. त्यावर महापौर व महापालिका आयुक्‍तांनी, "लवकरच निर्णय घेऊ,' असे जाहीर केले होते. त्यानंतरही शास्तीमाफीसाठी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्‍तांच्या दालनात ठिय्या दिला होता.

बुधवारी महापालिकेत कर विभागाची बैठक झाली. तीत आयुक्‍तांनी शास्तीची माहिती घेतली. किती शास्तीमाफी देता येईल, किती कालावधीसाठी देता येईल, त्यातून किती वसुली होईल, याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गुरुवारी कर उपायुक्‍त संतोष लांडगे यांनी आयुक्‍तांना अहवाल सादर केला. 

महापालिकेतील शास्तीमाफीचा निर्णय घेण्याचा अधिकार कलम 51नुसार आयुक्‍तांना आहे. सलग तीन दिवस महापालिकेला सुटी आल्याने आयुक्‍तांना निर्णयासाठी वेळ मिळाला. आयुक्‍तांनी आज निर्णय महापौरांना कळविला. त्यानुसार एक महिन्यासाठी 75 टक्‍के शास्तीमाफी देण्यात येणार आहे. 196 कोटींचा मालमत्ताकर थकीत आहे. यात 102 कोटींची शास्तीची रक्‍कम आहे. 94 कोटी रुपये केवळ थकीत कर आहे.

करावर लावतात २४ टक्के दंड

महापालिका मालमत्ताकर थकबाकीवर 24 टक्‍के शास्ती आकारली जाते. त्यामुळे शास्तीची रक्‍कम जास्त आहे. शास्ती ही बॅंकेतील व्याजापेक्षाही अधिक आहे. महापालिकेने यापूर्वी 2018मध्ये दोन महिन्यांसाठी 75 टक्‍के शास्तीमाफी दिली होती. त्या वेळी 39 कोटी रुपये वसूल करण्यात महापालिकेला यश आले होते. महापालिकेने नियमित मालमत्ताकर भरणाऱ्यांसाठी एप्रिल ते जून, असे तीन महिने 10 टक्‍के, तर जुलै ते ऑक्‍टोबरदरम्यान 8 टक्‍के सूट दिली होती. आजपासून ही सवलत बंद करण्यात आली आहे. 

कर्मचाऱ्यांची दिवाळी वसुलीत 

शास्तीमाफी महिनाभर दिली जाणार आहे. या काळातील दिवाळी सणादरम्यानही मालमत्ताकर भरता येणार आहे. यासाठी महापालिकेच्या चारही प्रभागांतील वसुली विभाग व हिशेब विभागातील कर्मचाऱ्यांना दिवाळीची सुटी देण्यात आलेली नाही. सुटीच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय खुले राहणार आहे. 

* एकूण मालमत्ताकर थकबाकी- 196 कोटी 
* शास्ती रक्‍कम- 102 कोटी 
* मूळ मालमत्ताकर थकबाकी- 94 कोटी 

 

शास्तीमाफीच्या कालावधीनंतरही जे मालमत्ताधारक आपली थकबाकी भरणार नाहीत, अशांवर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्यात येईल. कोरोना संकटामुळे मालमत्ताकराच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत 15 कोटी 50 लाख रुपये वसूल झाले आहेत. 
- श्रीकांत मायकलवार, आयुक्त, महापालिका 

 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Corporation decides to waive tax penalty