पिंपरी चिंचवडच्या "लोकमान्य"चा ठेका नगर महापालिकेला अमान्य

अमित आवारी
Thursday, 12 November 2020

सभापती कोतकर यांनी "लोकमान्य'चा प्रस्ताव फेटाळून लावत, त्यांच्याकडून मशीन घेतलेले असल्याने, महिनाभरात ते बसवून देण्याचा आदेश दिला.

नगर ः पिंपरी चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटलला एमआरआय मशीन चालविण्याचा ठेका देण्यास महापालिकेच्या स्थायी समितीच्या ऑनलाइन सभेत आज सदस्यांनी विरोध केला. येत्या महिनाभरात सावेडीतील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये एमआरआय मशीन बसवून देण्याचा आदेश "स्थायी'चे सभापती मनोज कोतकर यांनी दिला.

मशीन सुरू झाल्यावर त्याच्या ठेक्‍याचा निर्णय पुढील "स्थायी'च्या सभेत होणार आहे. जिल्हा नियोजन समितीने महापालिकेला एमआरआय मशीन खरेदीसाठी तीन कोटी पाच लाख रुपये दिले होते. त्यानुसार, महापालिकेने निविदाप्रक्रिया राबवून "लोकमान्य' संस्थेकडून मशीन घेतले. मात्र, त्यांनी अजून हे मशीन बसविलेले नाही. सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये हे मशीन बसविण्याचा निर्णय झाला होता. 

मशीन चालविण्यासाठी लोकमान्य संस्थेने दिलेल्या प्रस्तावात वीज व पाणी मोफत मिळावे, इमारतीसाठी भाडे आकारू नये, अशा अटी-शर्ती घातल्या होत्या. त्यास डॉ. सागर बोरुडे यांनी विरोध केला. महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी "लोकमान्य'चा प्रस्ताव मंजूर करू नये, असे ते म्हणाले. 

प्रकाश भागानगरे म्हणाले, की महापालिकेच्या प्रशासकीय हलगर्जीपणामुळे एमआरआय मशीन धूळखात पडली. ती जानेवारीतच सुरू केली असती, तर कोरोना संकटात तिचा उपयोग झाला असता. गणेश भोसले, श्‍याम नळकांडे यांनीही या "लोकमान्य'च्या निविदेला विरोध केला.

सभापती कोतकर यांनी "लोकमान्य'चा प्रस्ताव फेटाळून लावत, त्यांच्याकडून मशीन घेतलेले असल्याने, महिनाभरात ते बसवून देण्याचा आदेश दिला. एमआरआय प्रिंट योग्य आल्यावरच महापालिकेने मशीनचे बील द्यावे. मशीनची देखभाल व महापालिकेच्या आर्थिक फायद्याचा विचार करून योग्य त्या संस्थेला ठेका देण्यात येईल, असे कोतकर म्हणाले. 

कल्याण रस्ता परिसरात पाणीप्रश्‍न 
नगर-कल्याण रस्त्यावरील वसाहतीमधील पाणीप्रश्‍नावर सभेत वादळी चर्चा झाली. नगरसेवक श्‍याम नळकांडे यांनी नगर-कल्याण रस्ता परिसराला 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळत असल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. सभापती मनोज कोतकर यांनी सर्वांना पाणी मिळेल, असे नियोजन करण्याचा आदेश दिला. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Corporation rejects contract of Lokmanya hospital of Pimpri Chinchwad