अहमदनगर महापालिकेने केडगावमधील नालेच चोरले 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

केडगावमध्ये ओढे-नाले आता नावालाच उरले आहेत. नैसर्गिक वाहणारे ओढे-नाले अतिक्रमणांमुळे अचानक गायब होतात व पुन्हा उगम पावतात. काही ठिकाणी तर या नाल्यांवरच घरे बांधण्यात आली आहेत.

नगर : केडगावमध्ये ओढे-नाले आता नावालाच उरले आहेत. नैसर्गिक वाहणारे ओढे-नाले अतिक्रमणांमुळे अचानक गायब होतात व पुन्हा उगम पावतात. काही ठिकाणी तर या नाल्यांवरच घरे बांधण्यात आली आहेत. या घरांना अहमदनगर महापालिकेकडून बांधकाम परवानगीही मिळाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कृपेने अतिक्रमणांची नगरे उभी राहिली आहेत. 

अवश्‍य वाचा - राहुरीत व्यापाऱ्यांचा "आमदनी अठन्नी दंड भरा रुपय्या' 

पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून शहरात नालेसफाईची कामे करण्यात आली. मात्र, ही नालेसफाईची मोहीम केडगावमध्ये झाल्याचे दिसून येत नाही. या भागात मातीचे भराव घालून ओढ्या-नाल्यांना काही ठिकाणी अरुंद, तर बऱ्याच ठिकाणी नाले बुजविण्यात आले आहेत. केडगावमधील एकनाथनगर, शिवाजीनगर, भूषणनगर, वैष्णवनगर भागातून वाहणाऱ्या ओढे-नाल्यांवर जागोजागी अतिक्रमणे झाली आहेत. शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. या सर्व अतिक्रमणांना महापालिकेच्या नगररचना विभागाने परवानग्या दिल्या आहेत.

या नाल्याजवळ भिंत घालून घरे तयार करण्यात आली आहेत. एका ठिकाणी महापालिकेने नाल्यातच सार्वजनिक शौचालय उभे केले आहे. त्यामुळे केडगावमध्ये चांगला पाऊस झाल्यास शिवाजीनगर, एकनाथनगर भागात पूरस्थिती निर्माण होते. मोठा पाऊस झाल्यास या भागांत मोठी आर्थिक हानी होण्याचा धोका आहे. महापालिकेतील कर्तव्यदक्ष अधिकारी कल्याण बल्लाळ यांच्याकडे अतिक्रमण विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुखपद देण्यात आले आहे. ते ही अतिक्रमणे काढून केडगावमधील ओढ्या-नाल्यांचा श्‍वास मोकळा करतील, असा विश्‍वास केडगावमधील नागरिकांना वाटत आहे. 

केडगावमधील सोनेवाडी रस्ता, ओंकारनगर, इंदिरानगर, शाहूनगर, अंबिकानगर भागात ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. केडगावमध्ये बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक ओढे-नाले भराव टाकून गायब करण्यात आले आहेत. महापालिकेचे सार्वजनिक शौचालय, ओंकारनगर भागातील प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत नाल्यावरच आहे. नैसर्गिक ओढ्या-नाल्यांवर नागरिकांनी घरेही बांधली आहेत.

या घरांच्या खालून नाल्याचे पाणी जाण्यासाठी बंदिस्त जागा करण्यात आली आहे. केडगाव देवी परिसरातील शासकीय गोदामामागून वाहणाऱ्या नाल्यावर जागोजागी अतिक्रमणे झाली आहेत. हा नाला नगर-दौंड रस्त्याजवळ जाताना मोठा आहे. मात्र, नगर-दौंड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यावर प्लॉट तयार करण्यात आला असून, नाल्याला वळण देत त्याला भुयारी गटाराचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. या सर्व प्रकारांमुळे केडगावमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. याकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar Municipal Corporation stole the drain in Kedgaon