सराफाने दिली सोने चोरण्याची सुपारी; बाभुळगाव खालसा रस्तालूट प्रकरणी सहा जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

कर्जत तालुक्‍यातील बाभुळगाव खालसा शिवारात मिरजगाव येथील सराफाला अडवून रस्तालूट करणारी सहा जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून 18 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नगर : कर्जत तालुक्‍यातील बाभुळगाव खालसा शिवारात मिरजगाव येथील सराफाला अडवून रस्तालूट करणारी सहा जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून 18 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, एका सराफानेच ही रस्तालूट करण्यासाठी सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

माहिजळगाव येथील सोन्याचे दुकान बंद करून रविवारी (ता. 1) सायंकाळी सराफ व्यावसायिक अतुल चंद्रकांत पंडित (रा. मिरजगाव, कर्जत, अहमदनगर) मोटारीतून घरी जात होते. बाभुळगाव खालसा शिवारात दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोटारीची काच फोडून पंडित व त्यांच्याबरोबर असलेल्या एकाला जखमी केले. त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेल्या तीन बॅग हिसकावून घेतल्या, अशी फिर्याद पंडित यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिली. 

Ahmednagar news update हेही वाचा : नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चोरांच्या शोधार्थ नगर व कर्जत पोलिसांची दोन पथके रवाना झाली. घटनास्थळाजवळच पोलिसांना दुचाकी आढळली. तिचा मालक कर्जत पोलिस ठाण्यात दुचाकीचोरीची तक्रार देण्यासाठी आला. त्यातून आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. 

पुणे, कर्जत, नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी पथकाने कारवाई करीत सहा जणांच्या टोळीस अटक केली. अण्णासाहेब रामहरी गायकवाड (वय 28, रा. वाकड, पिंपरी चिंचवड), संदेश महादेव डाडर (रा. लांगोर गल्ली, कर्जत), भारत नवनाथ साळवे (वय 24, रा. राशीन, ता कर्जत), गणेश चंद्रकांत माळवे (रा. रायकरमळा, येवत, जि. पुणे), अक्षय बाबूराव धनवे (रा. प्रेमदान हाडको, नगर) व राम जिजाबा साळवे (रा. राशीन, ता. कर्जत) अशी त्यांची नावे आहेत. त्यातील आरोपी सराफ व्यावसायिक गणेश माळवे यानेच हा सर्व प्रकार घडवून आणल्याचेही तपासात समोर आले. 

जप्त केलेला मुद्देमाल 
आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे 113 ग्रॅमचे दागिने (अंदाजे किंमत 5 लाख 76 हजार) व 17 किलो 13 ग्रॅम चांदी (अंदाजे किंमत आठ लाख 50 हजार 690), शिवाय 3 लाख रुपये किंमतीची मोटार, 90 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, असा एकूण 18 लाख 16 हजार 690 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ahmednagar news update Six arrested in Babhulgaon Khalsa road robbery case