esakal | विहिरी तुडुंब, तरी कालव्यांवर मदार! राहाता येथे आज पाणीवाटप सल्लागार समितीची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar news Water Allocation Advisory Committee meeting today at Rahata

गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील विहिरी अतिवृष्टीमुळे तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होईल.

विहिरी तुडुंब, तरी कालव्यांवर मदार! राहाता येथे आज पाणीवाटप सल्लागार समितीची बैठक

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (अहमदनगर) : गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील विहिरी अतिवृष्टीमुळे तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात विक्रमी वाढ होईल. विजेची मागणी वाढून रोहित्रे जळू लागली, तर शेती धोक्‍यात येईल. त्यासाठी कालव्याच्या पाण्याचा आधार लागेल.

गोदावरी कालवे व वितरिका वेळेत स्वच्छ करून शेतीसाठी किमान चार-पाच आवर्तने द्यावी लागतील, तरच बारमाही शेती जगेल. त्यामुळे आज (ता. 7) नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राहाता येथे होणाऱ्या पाणीवाटप सल्लागार समितीच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

यंदा जायकवाडी धरणात पाणी सोडावे लागणार नसले, तरी गोदावरी कालव्यांच्या नशिबी आवर्तनटंचाईचे भोग कायम राहतील. विहिरी तुडुंब भरल्या, तरी पुरेशी वीज मिळण्याची खात्री नाही. पिके वाचविण्यासाठी कालव्यांच्या पाण्यावर मदार ठेवावी लागेल. सध्या कालवे व वितरिका गवत, काटेरी झुडपांत गडप झाल्या आहेत. त्यांची वेळेत स्वच्छता न झाल्यास धरणातील पाण्याचा मोठा अपव्यय होईल. सल्ल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे केलेले नियोजन जाहीर होते; मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे या बैठकांना काही अर्थ राहत नाही, असा यापूर्वीचा अनुभव आहे.

Ahmednagar news update हेही वाचा : नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

यंदा पाणलोट क्षेत्रात पावसाने हात आखडता घेतला. दारणा व गंगापूर धरणसमूहांत 30ऐवजी 26 टीएमसी पाणीसाठा आहे. बिगरसिंचनासाठी साडेदहा ते अकरा टीएमसी पाणी आरक्षित ठेवावे लागते. चार टीएमसी पाणी नाशिक महापालिकेसाठी राखीव असते. यंदा सिंचनासाठी अकरा ते साडेअकरा टीएमसी पाणी उपलब्ध असल्याचा दावा होत आहे. गोदावरी कालवे व वितरिकांचा देखभालीअभावी पुरता बोऱ्या वाजला आहे.

पूर्वी एका आवर्तनासाठी अडीच टीएमसी पाणी लागायचे. आता हे प्रमाण कधी कधी साडेचार टीएमसीवर जाते. वितरिका व कालव्यांची स्वच्छता न करता पाणी सोडले आणि एका आवर्तनाला साडेतीन ते चार टीएमसी पाणी वापरले गेल्यावर बारमाही शेतीचे कसे होणार, याचे उत्तर लाभक्षेत्रातील आमदार- खासदारांना शोधावे लागेल. याबाबत आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

...तरच शेतकऱ्यांना दिलासा 
आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेऊन, खास बाब म्हणून गोदावरी पाणीवाटप सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्रात आयोजित केली. आजवर मंत्रालयात या बैठका होत. त्यात झालेल्या नियोजनानुसार आवर्तने मिळतीलच याची खात्री नसे. उद्याच्या बैठकीत वितरिका, पोटवितरिका व कालव्यांची दुरुस्ती आणि शेतीसाठी चार-पाच आवर्तने असे निर्णय झाले, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image