
अहमदनगर : कांद्याची विक्रमी आवक
सोनई : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात आज (गुरुवारी) एक लाख २४६ कांदागोण्यांची विक्रमी आवक झाली. बाजारात सहा तासांत सहा कोटी रुपयांची उलाढाल झाली. उपबाजाराच्या १९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाचशे ट्रक कांदागोण्यांची आवक झाली आहे. (Ahmednagar News)
मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून घोडेगावात सन २००३ मध्ये कांद्याचा लिलाव सुरू करण्यात आला होता. अल्पावधीत येथील बाजार राज्यात नावारूपास आला. मागील एक महिन्यापासून येथे कांदागोण्यांची आवक वाढली होती. मागील आठवड्यात पन्नास हजार गोण्यांचा टप्पा पार झाला होता.(Onion News Updates)
आज पहाटेपासून टेम्पो, ट्रॅक्टर, रिक्षांनी कांद्याची आवक सुरू झाली होती. त्यामुळे नगर-औरंगाबाद रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी झाली. लिलाव संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बाजारातील गोण्या ट्रकमध्ये भरण्यात येत होत्या. पाचशेहून अधिक ट्रकच्या गर्दीने आवार हाऊसफुल्ल झालेले पाहायला मिळाले.
लिलावात क्रमांक एकच्या कांद्यास पंधराशे ते सतराशेचा भाव मिळाला. मध्यम कांद्यास तेराशे ते सोळाशे, गोल्टी कांद्यास पाचशे ते आठशे, जोडकांद्यास तीनशे ते सातशे, मोड डागी कांद्यास तीनशे ते सातशेचा भाव मिळाला. लिलावाच्या सहा तासांत सहा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सुदाम तागड यांनी सांगितले.
Web Title: Ahmednagar Onions Record Arrival
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..