अहमदनगर : विनयभंग करणाऱ्यास शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

अहमदनगर : विनयभंग करणाऱ्यास शिक्षा

अहमदनगर : अल्पवयीन मुलीचा रस्त्यात हात धरून तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या लक्ष्मीकांत नारायण ढगे (वय ४१, रा. गजानन महाराज मंदिराजवळ, गुलमोहर रस्ता) याला चार वर्षे सक्‍तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी ठोठावली.

अल्पवयीन मुलगी १५ एप्रिल २०१७ रोजी दिल्लीगेट भागातून वृत्तपत्र घेऊन घरी परत येत होती. आरोपी ढगे याने जवळ येऊन चौथीचे क्‍लास कोठे आहेत? अशी चौकशी करून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे करू लागला. या मुलीच्या घरी दूध देणारा आणि काही ओळखीच्या व्यक्‍तींनी ही घटना पाहिली. त्यावेळेस त्यांनी आरोपीला जाब विचारला असता, त्याने या प्रकाराची कबुली दिली.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी ढगे याच्याविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ (पोक्‍सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस उपनिरीक्षक के. डी. शिरदावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. या खटल्यात सरकारच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, मुलीचे पालक, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. ढगे याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास चार वर्षे सक्‍तमजुरी व सात हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ॲड. मोहन कुलकर्णी यांनी सरकारतर्फे काम पाहिले. पोलिस हवालदार मोहन डहारे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

चाईल्ड लाईनने दिला आधार

अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी चाईल्ड लाईनशी संपर्क साधला. चाईल्ड लाईनच्या सदस्यांनी मानसिक आधार दिला. मुलीच्या कुटुंबीयांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. चाईल्ड लाईनची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरली.

loading image
go to top