Ahmednagar : पहिल्या नागपूर-शिर्डी टप्प्याचे काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi-Highway

Ahmednagar : पहिल्या नागपूर-शिर्डी टप्प्याचे काम पूर्ण

शिर्डी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट, अशी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची ओळख आहे. राज्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या या महामार्गामुळे, राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर एकमेकांना जोडले जाईल. त्यातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. वेगाने पूर्णत्वास गेलेला देशातील सर्वांत मोठा जलदगती महामार्ग, असे आणखी एक बिरुद मिरविणाऱ्या या प्रकल्पाकडे अभियांत्रिकीची कमाल या दृष्टिकोनातूनही पाहिले जाते. साईबाबांच्या शिर्डीबरोबरच नगर जिल्ह्यालादेखील समृद्धीची वाट दाखविण्याची सुवर्णसंधी हा प्रकल्प देऊ शकेल.

या महामार्गावरून नागपूर ते शिर्डी हे सुमारे सातशे वीस किलोमीटर अंतर केवळ आठ ते दहा तासांत पूर्ण करणे शक्य होईल. साठ मीटर रुंदी आणि एकशे वीस मीटर भूसंपादन, अशी रचना असलेल्या या महामार्गाच्या एका बाजूला बुलेट ट्रेन, तर दुसऱ्या बाजूला सीएनजी गॅस वाहून नेणारी महाकाय वाहिनी असणार आहे. कुठेही भूसंपादन न करता तीन फूट खोलीवरून ही वाहिनी जाते. त्यातून राज्य सरकारला सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे. सीएनजी वाहिनीमुळे या अंतरातील रस्त्याभोवतालच्या भागात वायुवाहिन्यांचे जाळे उभारून थेट स्वयंपाक घरापर्यंत हा वायू पोचविला जाईल. सध्याचा एलपीजी गॅस आणि सिलिंडर काळाच्या उदरात हळूहळू गडप होऊन जाईल. या रस्त्यामुळे सलग जागा उपलब्ध झाली. त्यामुळे मुख्य गॅसवाहिनी टाकण्याचे ८० टक्के काम पूर्णदेखील झाले.

दर पन्नास किलोमीटर अंतरावर पेट्रोलपंप आहे. विविध पेट्रोलियम कंपन्यांनी हे पंप उभारले आहेत. ठिकठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर पंधरा एकर जागेत पेट्रोलपंप, सुसज्ज स्वच्छतागृहे, नामांकित कंपन्यांची उपाहारगृहे उभारली जात आहेत. दर चाळीस किलोमीटर अंतरावर, या रस्त्यावर प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग असेल. जेवढ्या अंतराचा प्रवास, तेवढाच टोल आकारला जाईल. रस्त्यावर कुठेही टोलनाका नाही. रस्ता सोडताना टोलनाके असतील. हा ग्रीन फिल्ड हायवे म्हणजे पूर्णतः नवा रस्ता आहे.

दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंती आणि जमीनसपाटीपासून सुमारे वीस फूट उंची, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. चढ-उतार आणि वळणे कमी असल्याने, वेग समान ठेवून वाहने चालविणे शक्य होईल. यामुळे काही प्रमाणात इंधनबचत होईल.

या रस्त्याची दृश्यमानता तब्बल पाच किलोमीटर असेल. याचा अर्थ असा, की वाहनचालकाला समोर पाच किलोमीटर अंतरापर्यंत दिसू शकेल. एकूण सातशे वीस किलोमीटर लांबी असलेल्या या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पाचशे वीस किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

साईभक्तांना वरदान

नागपूर ते मुंबई हा सातशे वीस किलोमीटर लांबीचा आणि सुमारे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्चाचा समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वाधिक मोठा प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्‍घाटन केले जाणार आहे. या जलदगती महामार्गामुळे शिर्डी ते औरंगाबाद हे अंतर अवघ्या चाळीस ते पन्नास मिनिटांत, तर शिर्डी ते मुंबई हे अंतर दोन तासांत पूर्ण करता येईल. शिर्डीच्या दृष्टीने मुंबई, गुजरात, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील साईभक्तांना हा रस्ता वरदान ठरेल.