Ahmednagar : ST महामंडळाची दिवाळी झाली गोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST from Ahmednagar

Ahmednagar : ST महामंडळाची दिवाळी झाली गोड

अहमदनगर : एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने दिवाळीनिमित्त १० दिवस जादा बसचे नियोजन केले होते. या १० दिवसांत महामंडळाने आठ कोटी ९५ लाख ८८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. कोविड व एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळाला मोठे उत्पन्न मिळविता आले.

कोविड संकटकाळानंतरची ही पहिलीच खुली दिवाळी असल्याने नागरिकांनी ती उत्साहात साजरी केली. दिवाळीच्या सुट्यांत गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त होती. गर्दी पाहता, विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिवाळीतील दहा दिवसांच्या वाहतुकीचे नियोजन केले. त्यानुसार २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ९५ जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. या बसगाड्यांनी २३ लाख किलोमीटरचा प्रवास केला.

सुरक्षित प्रवासासाठी अनेकांनी एसटी महामंडळालाच प्राधान्य दिले. त्यामुळे एसटी बसना तोबा गर्दी होती. २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्याने अनेकांनी प्रवास टाळला. तो दिवस वगळता उर्वरित ९ दिवसांत बसस्थानकांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वाढती गर्दी पाहता, विभाग नियंत्रक सपकाळ स्वतः बसस्थानकात बसून होत्या. त्यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणखी जादा बसचे नियोजन केले होते.

या गर्दीचा सकारात्मक परिणाम एसटीच्या उत्पन्न वाढण्यात झाला आहे. बुधवारी (ता. ९) शाळा सुरू होणार असल्याने, आपापल्या गावी गेलेले चाकरमाने आता शहरात परतू लागले आहेत. त्यामुळे बसना गर्दी आहे. मात्र, दोन ते तीन दिवसांत ती ओसरणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे यात्रा बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय झाला असून, शनिवारी (ता. १२) अष्टविनायक यात्रेसाठी बस निघणार आहे.

ऐन दिवाळीत गर्दी असूनही प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासावर विश्‍वास ठेवला. कमी गाड्या असूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त फेऱ्या केल्या. त्यामुळे कोविड कालावधीनंतर महामंडळाला चांगले उत्पन्न मिळू शकले.

- मनीषा सपकाळ, विभाग नियंत्रक, एसटी

तारकपूर (नगर) - १११.५४

शेवगाव - ७०.८६

जामखेड - ७२.९३

श्रीरामपूर - ८९.११

कोपरगाव - १०१.६५

पारनेर - ७०.९८

संगमनेर - ९१.६८

श्रीगोंदे - ७८.७८

नेवासे - ६९.४८

पाथर्डी - ७२.७८

अकोले - ६६.०९