Ahmednagar : साखर सम्राट पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर ; राजू शेट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजू शेट्टी

Ahmednagar : साखर सम्राट पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर ; राजू शेट्टी

राहुरी : राज्यातील दोनशे साखर कारखान्यांनी काटा मारीत एक कोटी ३२ लाख टन ऊसावर डल्ला मारुन ४ हजार ६०० कोटींचा दरोडा घातला. साखर उतारा, मोलॅसेस, इथेनॉलमध्ये चोऱ्या करून, ऊस दरात फटका देणारे दोनशे साखर सम्राट पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर आहेत. त्यांना साडेतीन कोटी ऊस उत्पादक शेतकरी वठणीवर आणतील, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. टाकळीमियाँ येथे ऊस परिषदेमध्ये शेट्टी बोलत होते.

अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब करपे होते. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, अनंत निकम, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, सुनील लोंढे, बाळासाहेब जाधव, अमृत धुमाळ, शामराव निमसे, उपसरपंच किशोर मोरे, सुभाष करपे, दत्तात्रय आढाव, संतोष चोळके, जितेंद्र शिंदे उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, की साखर उतारा चोरून, बिनशिक्क्याची साखर पोत्यांची मध्यरात्री कारखान्यातून वाहतूक होते. कोल्हापूर जिल्ह्यात २९०० ते ३३०० पर्यंत ऊस दर मिळतो. अहमदनगर जिल्ह्यात २१०० ते २४०० एवढा कमी ऊसदर मिळतो. महागाईचा आगडोंब उसळला. परंतु, दहा वर्षांपूर्वीचा ऊसदर आजही तोच आहे. व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला. तरच योग्य ऊसदर मिळेल. राजकीय विरोधक विखे-थोरात यांचे ऊसदर कमी देण्यावर एकमत असते.

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करून, त्यावर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे. मागील वर्षीची एफआरपी अधिक दोनशे रुपये, यंदाच्या वर्षी एकरकमी एफआरपी अधिक तीनशे पन्नास रुपये मिळावेत. स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळातर्फे राज्यातील नऊ लाख ऊस तोडणी मजुरांची नोंदणी करावी. शेतकरी, ऊस तोडणी मजुरांची लूटमार करणारे मुकादम वगळून महामंडळातर्फे साखर कारखान्यांना मजूर पुरवावेत. अशा विविध मागण्यांसाठी सात नोव्हेंबर रोजी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा होईल.

शासनाने मागण्या मान्य केल्या नाही. तर, सतरा व अठरा नोव्हेंबर रोजी राज्यभरात ऊस वाहतूक बंद करून, दोन दिवस साखर कारखाने बंद पाडले जातील.

- राजू शेट्टी, माजी खासदार