
अहमदनगर : अतिरिक्त उसाचा तिढा सुटणा
अहमदनगर: जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यातून अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिरिक्त ऊसगाळपाची जबाबदारी शेजारील कारखान्यांवर विभागून दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या साखर आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. तसा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे ८० हजार मेट्रिक टन ऊसगाळपाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ३० एप्रिल रोजी खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्ह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाबाबत त्यांचे लक्ष लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी वेधले होते. त्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त ऊसगाळपाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, प्रादेशिक संचालक (साखर) मिलिंद भालेराव, लेखापरीक्षण अधिकारी संतोष पवार आदींच्या उपस्थितीमध्ये आज (गुरुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यात १४ सहकारी आणि नऊ खासगी साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. जिल्ह्यात एक कोटी ७३ लाख ३० हजार १३ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. एक कोटी ७३ लाख ४९ हजार ८२८ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
जिल्ह्याच्या उत्तर भागात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहाता, श्रीरामपूर आणि नेवासे या तीन तालुक्यांतील उसाचे क्षेत्र जास्त आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक दोन लाख २५ हजार मेट्रिक टन ऊस आहे. यापैकी एक लाख ४० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. या ठिकाणी ८० हजार मेट्रिक टन अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या उसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने (प्रवरा) ३० हजार मेट्रिक टन, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकरी साखर कारखाना (संगमनेर) यांनी २५ हजार मेट्रिक टन, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी २५ मेट्रिक टन उसाचे गाळप करावे. सध्या उन्हाळ्यामुळे ऊस तोडणी मजूर उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक कारखान्याने गाळप बंद झालेल्या साखर कारखान्यांकडील हार्वेस्टर आणून उसाची तोडणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहे. ज्या कारखान्याच्या क्षेत्रात जादा ऊस आहे. त्यांनी सहा जूनपर्यंत गळीत हंगाम बंद करू नये, असे ही निर्देश देण्यात आले आहेत.
दक्षिणेतील कारखाने बंद
जिल्ह्याच्या दक्षिण भागात उसाचे क्षेत्र कमी आहे. साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी झालेले आणि बिगर नोंदणी झालेल्या उसाचे गाळप केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपला आहे. अशा चार कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. त्यामध्ये क्रांती शुगर, जय श्रीराम, राहुरी हे कारखाने बंद झाले आहेत. कुकडी, श्रीगोंदे, पीयूष, अंबालिका आणि युटेक या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप पूर्ण होत आले आहे.
ज्या ठिकाणी ऊस जादा आहे, अशा परिसरातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या सहा जूनपर्यंत चालविले जाणार आहेत. ज्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यांच्याकडील ऊस तोडणी यंत्रे अन्यत्र वापरली जाणार आहेत. सर्व उसाचे गाळप करण्यासाठीचा प्रस्ताव साखर आयुक्तांना पाठविला जाणार आहे.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
Web Title: Ahmednagar Sugarcane Leaves Sugar Commissioner
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..