esakal | Ahmednagar : घर घेता का घर कुणी !
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar

Ahmednagar : घर घेता का घर कुणी !

sakal_logo
By
मुरलीधर कराळे :सरकारनामा ब्युरो

अहमदनगर  ः महापालिका क्षेत्रात गरीब व आर्थिक दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृहप्रकल्पाची एक हजार 732 घरांना मंजुरी मिळाली आहे. मात्र कोरोना तसेच इतर कारणांनी या घरांना लाभार्थ्यांचा अल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकेकाळी ‘घर देता का कोणी घर’ असे म्हटले जात होते. आता मात्र ‘घर घेता का घर,’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.बेघर असलेले कुटुंब आहेत. या लोकांना घरांसाठी कर्ज मंजूर करताना बँकांपुढे अडचणी असतात. त्‍यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

महापालिकेच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल योजना प्रस्तावित केली. त्यामध्ये मोरचूदनगर (संजयनगर), केडगाव, नालेगाव व आगरकर मळा आदी ठिकाणी घरे बांधण्याचे नियोजन केले. काही ठिकाणी ही कामे सुरूही झाली आहेत. या प्रकल्पांपैकी संजयनगर येथील प्रकल्पासाठी लाभार्थी हिस्सा अत्यंत कमी आहे. तसेच त्यांना स्टोन फाउंडेशन या संस्थेचे अनुदानही मिळणार आहे. म्हणजे केवळ एक लाख रुपये हा लाभार्थीचा हिस्सा असेल. असे असतानाही प्रतिसाद कमी आहे.

हेही वाचा: महावितरणचा अभियंता लाचेच्या जाळ्यात

इतर तिन ठिकाणी लाभार्थींचा हिस्सा जास्त म्हणजे सहा ते सात लाखांपर्यंत आहे. त्यामध्येही अडीच लाख रुपये शासनाकडून अनुदान मिळणार आहे. काही लाभार्थ्यांनी त्यांच्या हिस्स्याची भरलेली रक्कम परतावा मिळण्यासाठी मागणी केली आहे. घरांची नोंदणी होण्यासाठी महापालिकेच्यावतीने (सोल सेलिंग अॅण्ड मार्केटिंग असिस्टंट) नवीन एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांचे महापालिकेतच एक कार्यालय असेल. एकूण सदनिका रकमेच्या एक टक्का रक्कम ही महापालिकेमार्फत, तर एक टक्का रक्कम ही लाभार्थींमार्फत संबंधित एजन्सीला देण्याचे नियोजन आहे.

लाभार्थींच्या अडचणी

 1. आर्थिक दुर्बल घटकांतील असल्याने लाखांवरील रक्कम भरता येत नाही

 2. उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने बॅंकांमध्ये कर्ज मंजुरीला अडचणी

 3. कागदपत्रांची पूर्तता होत नाही

 4. पुरेशी जाहिरात नसल्याने लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचत नाही

 5. शासनाकडूनही अनुदान थकल्याने काम संथ गतीने. त्यामुळे लाभार्थी आकर्षित होत नाही

महापालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुलांची योजना चांगली आहे. आवश्यक ती माहिती लाभार्थींपर्यंत पोहचत नसल्याने तसेच इतर अडचणींमुळे नोंदणीला प्रतिसाद अत्यल्प आहे.

- राजेंद्र मेहेत्रे,

प्रकल्प अधिकारी, महानगरपालिका

हेही वाचा: साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

 1. केडगाव - या प्रकल्पातील 26 इमारतींपैकी तीन इमारतींचे फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे. इतर कामांना निधीचा अडसर येत आहे.

 2. नालेगाव - या प्रकल्पाचे बांधकाम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद नाही.

 3. मोरचूदनगर - सात इमारतींपैकी एक इमारतीमधील 33 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पुढील बांधकाम प्रगतीपथावर.

 4. आगरकर मळा - बांधकामासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया चालू आहे.

नवीन एजन्सीची अशी असेल जबाबदारी

 1. सदनिकेची विक्री करणे, प्रकल्पाची जाहिरात करणे

 2. प्रकल्पाची आॅनलाईन व आॅफलाईन मार्केटिंग करणे

 3. लाभार्थीकडून त्यांचा हिस्सा भरण्यास प्रवृत्त करणे

 4. प्रकल्पांचे रेरा नुसार रजिस्ट्रेशन करण्यास साह्य करणे

 5. प्रकल्पास कॅश फ्लोसाठी साह्य करणे

loading image
go to top