esakal | अजितदादांच्या एका शब्दाने नगरचं राजकारण फिरलं! भाजपचे गायकर बिनविरोध, पिचडांसाठी केला पेच

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar changed the politics of Ahmednagar}

सहकाराचे शुद्धीकरण करण्यासाठी आपण निवडणूक लढवीत होतो; परंतु पवार यांनी आपल्याला शब्द दिला आहे, की कारखान्यात सहकार्य करू.

अजितदादांच्या एका शब्दाने नगरचं राजकारण फिरलं! भाजपचे गायकर बिनविरोध, पिचडांसाठी केला पेच
sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले : अहमदनगर जिल्हा बँकेत महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपच्या विखे पाटील गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. काही संचालक बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आलं आहे. परंतु महाविकास आघाडीने त्यांची नाकेबंदी केली आहे. विशेषतः ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.

उपमुख्यमंत्री पवार यांनी एकाच शब्दांत सांगितलं आणि बँकेचे राजकारणच बदललं. त्यांच्यामुळे जिल्हा बँकेत भाजपचे सीताराम पाटील गायकर बिनविरोध संचालक होण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा - लंके, नागवडे यांची कोणासाठी माघार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द अंतिम मानत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत व सुरेश गडाख जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतून उद्या (गुरुवारी) माघार घेणार आहेत. तसे त्यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

माजी आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात मात्र अमित भांगरे यांचा अर्ज ठेवण्याचा निर्णय आज अकोले विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत झाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

या वेळी दशरथ सावंत म्हणाले, ""नाशिक येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीतून आपले अर्ज मागे घेत आहोत. त्यांचा शब्द अंतिम मानून मी स्वतः व सुरेश गडाख निवडणुकीतून माघार घेत आहोत. बॅंकेच्या निवडणुकीबाबत सर्व चर्चा सार्वजनिक व्हावी म्हणून आपण पत्रकार परिषद घेतली.'' 

""सहकाराचे शुद्धीकरण करण्यासाठी आपण निवडणूक लढवीत होतो; परंतु पवार यांनी आपल्याला शब्द दिला आहे, की कारखान्यात सहकार्य करू. आपली उमेदवारी ही पक्षाची होती; परंतु शब्द प्रमाण म्हणून मी माघार घेत आहे,'' असे गडाख यांनी सांगितले. 

कारखान्याच्या निवडणुकीत परतफेड

उपमुख्यमंत्री पवार यांनी शब्द टाकल्याने सावंत आणि गडाख यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे गायकर संचालक होणार असल्याने या राजकारणाला मोठे महत्त्व आले आहे. गायकर यांना मोकळी वाट करून देताना पिचड यांची नाकेबंदी करण्यात आली आहे. गायकर या संचालकपदाची परतफेड कारखान्याच्या निवडणुकीत करण्याची शक्यता राजकीय जाणकार बोलून दाखवित आहेत.

संपादन - अशोक निंबाळकर