अकोले : शेकरूंची संख्या घटली

वन विभागाच्या प्रगणनेचा अहवाल
शेकरूं
शेकरूंsakal

अकोले : अकोले कळसूबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत शेकरूंची संख्या कमी झाली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या प्रगणनेत ही बाब निदर्शनास आली.शेकरू हा प्राणी कळसूबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्य, तसेच लगतच्या भीमाशंकर अभयारण्य परिसरात आढळतो. हरिश्‍चंद्रगड परिसरातील कोथळे, देवराई, तोलारखिंड, तसेच आंबीत, पाचनई, कुमशेत येथील वनांमध्ये शेकरूचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेकरू झाडावर नवीन घरटी बांधतात. कळसूबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्यात ३० मे ते तीन जून या कालावधीत भंडारदरा व राजूर वन्य जीव वनपरिक्षेत्रात ही गणना करण्यात आली.

हरिश्‍चंद्रगड परिसरातील कोथळे, आंबीत, पाचनई परिसरात ४७ शेकरू दिसून आले. याशिवाय झाडांवर शेकरूंची नव्याने बांधलेली १७७, तर जुनी १३५ घरटी आढळून आली. शिवाय ४२ घरटी सोडून दिलेली दिसली. आंबा, हिरडा, लोध, उंबर, करप, करंबू, जांभूळ, आवळा, येहळा आदी झाडांवर शेकरू तसेच त्यांच्या घरट्यांचे अस्तित्व आढळले.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील कोलटेंभे व रतनवाडी परिसरातील जंगलातील ११ शेकरू प्रत्यक्ष दिसले. तसेच वापरात असलेली १९ घरटी दिसून आली.

प्रत्यक्षात ५८ शेकरू दिसले असले, तरी नव्याने बांधलेली घरटी पाहता त्यांची संख्या ७० ते ७५ असावी, असा अंदाज आहे. गतवर्षी अभयारण्यात ९७ शेकरू दिसले होते. तसेच त्यांची ३९६ घरटी दिसून आली होती. गतवर्षी त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत शेकरूंच्या संख्येत दीड पट वाढ दिसून आली होती. या वर्षी मात्र त्यांच्या संख्येत घट झाली आहे. शेकरू हा राज्य प्राणी असून, त्याचे लाल डोळे तसेच झुपकेदार शेपटी सर्वांना आकर्षून घेते. या प्राण्याच्या जतन, संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com