पोलिस नाईकाची बदली रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले

सचिन सातपुते
Tuesday, 8 September 2020

शेवगाव पोलीस ठाण्यात सहा वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस नाईक राजू तुकाराम चव्हाण यांची बदली नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात झाली. चव्हाण यांची काम करण्याची हातोटी वेगळी असल्याने पोलीस ठाण्यात येणा-या प्रत्येक नागरीकांना ते आपलेसे वाटत.

शेवगाव : सहा वर्षांपासून शेवगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक पदावरील कर्मचा-याची बदली नगर येथे झाल्याने ती रद्द करण्यासाठी शेवगाव शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत.

पोलीस ठाण्यात येणा-या सर्व सामान्य नागरीकांना आपुलकीची वागणुक देवून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची हातोटी असलेल्या या पोलीस कर्मचा-याची बदली रद्द करण्यासाठी नागरीकांचा दबाव वाढत असून ही पोलीस ठाण्याच्या इतिहासातील आगळीवेगळी घटना आहे. त्यासाठी सोशल मिडीया व इतर सर्व माध्यमातून नागरीकांची एकजुट झाली आहे. 

शेवगाव पोलीस ठाण्यात सहा वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस नाईक राजू तुकाराम चव्हाण यांची बदली नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात झाली. चव्हाण यांची काम करण्याची हातोटी वेगळी असल्याने पोलीस ठाण्यात येणा-या प्रत्येक नागरीकांना ते आपलेसे वाटत. येथे समस्या व अडचणी घेवून येणा-या प्रत्येक नागरीकाला न्याय देण्यात ते अग्रेसर असल्याने सर्वांना ते आपलेसे वाटत असत.

हेही वाचा - मोनिका राजळेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

मुंबई येथून २८ जुलै २०१४ रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात आल्यापासून प्रथम अडीच वर्ष सामान्य विभागात त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी त्यांची नियुक्ती गुप्तवार्ता विभागात केली. त्यानंतर २०१७ पासून वेगवेगळया निवडणुका, यात्राउत्सव, राजकीय मेळावे, आंदोलन, मोर्चा योग्य प्रकारे हाताळत नागरीक आणि पोलीस प्रशासन यांच्यात योग्य समन्वय ठेवण्याचे काम केले. त्यामुळे तीन चार वर्षात अनेक अधिकारी बदलेले तरी नागरीकांशी असलेले सलोख्याचे संबंध पाहून त्यांना त्याच विभागात कार्यरत ठेवण्यात आले. त्यामुळे या कालावधीत शेवगाव शहरात जातीय सलोखा, शांतता, सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यात यश आले. 

शहरातील खंडोबा व सोनमियाँ यात्रेतील अनुचित प्रकार व मुलींच्या छेडछाडीच्या घटना टाळण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधून केलेल्या योग्य त्या उपाययोजनेमुळे हे प्रकार थांबवण्यात पोलीसांना यश आले. पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील सर्वसामान्य भटक्या कुटूंबातून या पदावर पोहचलेल्या चव्हाण यांनी कायमच सर्व सामान्य, गरीब, भटक्या कुटूंबातील बेरोजगार मुलांनी पुढे येवून वेगवेगळ्या पदावर काम करावे यासाठी शेवगाव येथे पारधी समाजातील युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे नियोजन केले. त्यामध्ये ९०० जण सहभागी झाले. त्यामुळे त्यांचा तत्कालीन पोलीस अधिक्षख रंजनकुमार शर्मा यांनी ही गौरव केला.

कोरोनाच्या लाँकडाऊनच्या काळात शहरातून पायी जाणा-या परप्रांतीय मजूरांना जेवणाची व निवा-याची सोय करुन पोलीसातील माणुसकीचे दर्शन घडवले. सर्वच सामाजिक उपक्रमामध्ये शहरातील युवकांच्या खांदयाला खांदा लावून ते काम करत असल्याने सर्वांनाच त्यांच्या बद्दल व पोलीसातील खाक्या वर्दीतील माणुसकीबद्दल आदर आहे.

पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी काल सोमवार ता.७ रोजी केलेल्या जिल्हयातील पोलीस कर्मचा-यांच्या बदल्यांमध्ये चव्हाण यांच्यासह शेवगाव पोलीस ठाण्यातील सहा जणांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर शेवगाव शहर व तालुक्यातून सोशल मिडीयावर त्यांची बदली रद्द करण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ चर्चा झडू लागली आहे. त्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक व इतर क्षेत्रातील कार्यकर्ते एकवटले आहेत. त्यांची ही बदली रद्द व्हावी यासाठी त्यांनी पोलीस उपाधिक्षक मंदार जवळे यांना निवेदन दिले आहे. 

ही बदली रद्द न झाल्यास वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे एका पोलीस कर्मचा-याची बदली रद्द व्हावी यासाठी प्रथमच सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटल्याने पोलीस प्रशासनात तो चर्चेचा विषय ठरला आहे.  

 

शासकीय सेवा बजावतांना बदली होणे हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. आपण काम करतांना येणा-या प्रत्येक नागरीकाला योग्य ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तो कुठेही कार्यरत असलो तरी यापुढेही कायम राहील. नागरीकांनी संयम ठेवून सहकार्य करावे.

- राजू चव्हाण, पोलिस नाईक 
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All parties rallied to cancel Naik's transfer