नापासांच्या शाळेत सगळेच झाले पास, अण्णा हजारे चालवतात ही शाळा

मार्तंड बुचुडे
Thursday, 16 July 2020

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाणलोटतील कामाविषयी तसेच भ्रष्टाचारविरोधी किंवा माहिती अधिकार कायद्याविषयी लढताना संपूर्ण जगाने पाहिले आहे. परंतु त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रातीही अनेक प्रयोग केले आहेत.

पारनेर ः राज्यात अनेक नावलौकिक असलेल्या शाळा आहेत. त्या शाळांचा निकाल नक्कीच शंभर टक्के लागतो. परंतु तेथे प्रवेश देतानाच किमान नव्वद टक्क्यांच्या पुढे गुण असावे लागतात. आता ज्या शाळेत सर्वच गुणवत्ताधारक आहेत म्हटल्यावर तेथील निकाल चांगला लागणार. परंतु पारनेर तालुक्यात एक अशी शाळा आहे की जिथे नापासांनाच अॅडमिशन मिळते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाणलोटतील कामाविषयी तसेच भ्रष्टाचारविरोधी किंवा माहिती अधिकार कायद्याविषयी लढताना संपूर्ण जगाने पाहिले आहे. परंतु त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रातीही अनेक प्रयोग केले आहेत. त्यातील एक म्हणजे नापासांची शाळा.

या शाळात जे नापास विद्यार्थी आहेत, त्यांना प्रवेश दिला जातो. ही प्रमुख अट त्यांनी ठेवली होती. त्या विद्यार्थ्याला व्यसन असेल तर पहिल्या क्रमांकाने प्रवेश मिळतो. व्रात्य मुलांनाही या शाळेत लवकर प्रवेश दिला जातो. या सर्व विद्यार्थ्यांवर या शाळेत विविध प्रयोग केले जातात. ते सर्व विद्यार्थी आपल्या वाईट सवयी बदलून अभ्यासाला लागतात. शाळेतून बाहेर पडताना ते आदर्श विद्यार्थी बनलेले असतात. आतापर्यंत या शाळेतील अनेक विद्यार्थी अधिकारी झाले आहेत. अण्णांचा हा शैक्षणिक प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला आहे.  

राज्यातील एकमेव नापासांची शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या, राळेगणसिद्धी येथील संत निळोबाराय विद्यालयाचा कला व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखली, अशी माहिती प्राचार्य दिलीप देशमुख यांनी दिली.

हेही वाचा - कलेक्टरसाहेब डॉक्टरय म्हणून सांगतो लॉकडाउन करा

राळेगणसिद्धी येथील कला शाखेतील सर्व 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत 57 विद्यार्थी शिकत होते, तेही सर्व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

सेवानिवृत्त प्राचार्य सोमनाथ वाकचौरे यांच्यासाठी त्यांच्या काळातील शेवटचा निकाल होता. तो शंभर टक्के लागला. कला शाखेतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय विद्यार्थी : सुजाता खामकर, प्रीती वाघोले व कोमल पडघन. विज्ञान शाखा- अक्षदा रासकर, ऐश्वर्या रासकर व प्रिया गाजरे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All pass in Napas school