वणव्यावरून वन, सामाजिक वनिकरण विभागात आरोपांचा आगडोंब

शांताराम काळे
Saturday, 5 December 2020

अकोले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या डोंगरावर वृक्षारोपण केले होते. त्यासाठी ठिबक सिंचन केले होते. मात्र, अचानक लागलेल्या आगीत झाडांसह ठिबक संचही जळून खाक झाला.

अकोले : अंबड, वाकड डोंगराला लागलेल्या आगीत सीताफळाच्या सुमारे आठशे झाडांसह ठिबक संच जळून खाक झाला. दरम्यान, विभागीय वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागात या जळितावरून तू-तू मैं-मैं सुरू झाले आहे. 

अकोले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या डोंगरावर वृक्षारोपण केले होते. त्यासाठी ठिबक सिंचन केले होते. मात्र, अचानक लागलेल्या आगीत झाडांसह ठिबक संचही जळून खाक झाला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थ्यांसह अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

जागतिक पर्यावरणदिनीच हा प्रकार घडल्याने निसर्गप्रेमींनी खेद व्यक्त करीत संबंधित विभागाला विचारणा केली. वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले यांनी हा विषय सामाजिक वनीकरण विभागाचा असल्याचे सांगितले, 

सामाजिक वनीकरण विभागाच्या वनक्षेत्रपाल गाडे यांनी "हा विषय सामाजिक वनीकरण विभागाचा नाही. जंगल क्षेत्रात जाळपट्टे घेण्याचे काम सामाजिक वनीकरणाचे नाही,' असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allegations against officials of Forest, Social Forestry Department