हरिश्चंद्रगडावरील पुरातन मंदिराची दुरावस्था ; नंदीचे तोंड झाले नाहीसे ! मूर्ती गायब

शांताराम काळे 
Wednesday, 30 December 2020

मंदिराच्या शेजारी असलेल्या पुष्करणी जवळील देवदेवतांच्या १५ मूर्ती एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यात आल्या असून त्यावर मोठी धूळ बसली आहे. 

अकोले (अहमदनगर) : हरिश्चंद्र गड मंदिराकडे पुरातत्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे त्याचे अस्तित्व संपुष्ठात येणार तर नाही ना? अशी शंका या भागातील आदिवासींच्या मनात घर करू लागली आहे. वर्षांनुवर्षे या मंदिराचा ढाच्या व दगडी काम सरकू लागले आहे. या मंदिराच्या दगडाला देखील हात लावल्यास त्यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर पुरातत्व खाते संबंधित व्यक्ती अगर संस्थेवर दंड व कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचनाचे फलकचं मंदिराच्या दर्शनी भागावर लावण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक लोक या मंदिराची जीर्ण अवस्था उघड्या डोळ्याने पहात आहे. 

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या गडावर एक मजूर ठेवण्यात आला आहे. तो सातत्याने दगड सरकला, मूर्ती चोरीला गेली की, पाचनई ग्रामस्थांचे पत्र घेऊन नगरला जाणार व पुरातत्व खात्याला निरोप पोहच करत असे. मात्र, हा विभाग या बाबीकडे लक्ष देताना दिसत नाही. गेल्या महिन्यात या मंदिरातील विठ्ठल रुख्मिणी मूर्ती चोरीस गेल्या आहेत. त्या भग्न अवस्थेत सापडल्या आहे. मात्र त्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी नसल्याने या मूर्ती सध्या पोलिस पाटील बरकु भार मल यांच्या घरी ठेवण्यात आल्या आहेत. तर मंदिराच्या शेजारी असलेल्या पुष्करणी जवळील देवदेवतांच्या १५ मूर्ती एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यात आल्या असून त्यावर मोठी धूळ बसली आहे. 

हे ही वाचा : विना इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सायकल रॅली

मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात उभ्या असलेल्या दगडी शिळा भंग पावलेल्या आहेत. ऊन, पाऊस अधिक असल्याने चिरा पडल्या आहेत. आजूबाजूला दगड नुसतेच पडून आहेत. पिंडी, नंदी यांचे अर्धे भाग तुटले आहेत. तर दगडांना शेवाळ बसलेला असून मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गळते सुरु आहे. पुष्करणीमधील पाणी खराब झाले आहे. आजूबाजूला प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात असून स्वच्छतेचा अभाव सुरु आहे. स्थानिक ग्रामस्थ मंदिरात पूजा अर्चा करतात. तिथे स्वच्छता गृह नाही. त्यात मुक्कामाला असणारे पर्यटक घाण करतात. त्यामुळे गुहेच्या बाजूला दुर्गंधी येते. तर काहीजण निर्बंध असून धूम्रपान, मध पान करताना दिसतात. त्यामुळे परिसरात बाटल्या पडलेल्या दिसतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे  ऍप 

३१ डिसेंबरला गडावर बंदी असल्याने पर्यटक त्यापूर्वीच गर्दी करू लागले आहे. कळसूबाईप्रमाणे गडावर विजेची व्यवस्था किंवा सोलर प्रकल्प लावून वीज द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तर गडावर जाण्यासाठी रस्ता वन विभागाने करावा. राजूर ते पाच नई रस्ता लोकप्रतिनिधीनी करण्याची मागणी होती. माजी आमदारांच्या निधीतून केळी ओतूर ते पेठयाची वाडीपर्यंत रस्त्याचे काम सुरू झाले आहे. पुरातत्व खाते यांनी मंदिराच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे सुरेश भांगरे, चंदर भारमल व पाचनई ग्रामस्थांनी केली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ancient temple at Harishchandragad in Akole is in a bad condition