अण्णा हजारेंचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला, म्हणाले.. | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anna Hazare advised the agitating ST workers

अण्णा हजारेंचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला, म्हणाले..

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार करावा. तसे केल्यास सरकार घाबरून तुमच्या मागण्या मान्य करेल, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी बोलताना केले.

राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट आहे. शासनाकडून मात्र अजून कुठलेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने पारनेर येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आबा भोंडवे, सचिन थोरात, सुरेश औटी, गणेश चौधरी, मच्छिंद्र शिंदे, संदीप शिंदे, बापू शिंदे, अरुण मोकाते, नितीन सुरवसे, स्वरूपा वैद्य, कल्पना नगरे, सविता शिंदे आदींनी हजारे यांच्यासमोर प्रश्‍न मांडले.

यावेळी हजारे म्हणाले, की एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करीन. मागील १७ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरू ठेवा. आंदोलनादरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे आपणाकडून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: मालेगावात बंदला गालबोट; बंद दरम्यान पोलिस व दुकानांवर दगडफेक

आंदोलनकर्ते व सरकार वेगळे नाहीत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा विचार करायला पाहिजे. ३८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनदेखील सरकारला जाग येत नसेल, तर लाखो लोकांनी एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजे, तरच सरकारचे तोंड उघडेल व आपल्या मागण्या मान्य होतील.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

हेही वाचा: अहमदनगर | विकृतीचा कळस! वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

loading image
go to top