मालेगाव बंदला गालबोट; बंद दरम्यान पोलिस व दुकानांवर दगडफेक | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mob hurled stones at shops and police in malegaon in muslim community protest against tripura violence

मालेगावात बंदला गालबोट; बंद दरम्यान पोलिस व दुकानांवर दगडफेक

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होत असलेले हल्ले तसेच प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मुस्लीम समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ रझा अकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात गालबोट लागले. बंदचे आवाहन करणाऱ्या जमावाने सुरवातीला चहा टपरी, हॉटेल व बसस्थानक परिसरात दगडफेक केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता पोलिस व जमाव समोरासमोर आला. जमावाने केलेल्या दगडफेकीत सात-आठ किरकोळ जखमी झाले. पुर्व भागात तणावपुर्ण शांतता आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अल्पसंख्यांक समाजावरील होणाऱ्या हल्ल्यांवर आळा घालावा. हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १२) बंद पुकारण्यात आला होता. बंदला शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व घटकांनी पाठिंबा दिला होता. शहराच्या पुर्व भागातील रिक्षा, पॉवरलुम, विविध बाजारपेठा, व्यवसाय पुर्णपणे बंद होते. दुध व मेडीकल वगळता बीफ व भाजीपाला विक्री देखील बंद होती. पुर्व भागात बंद शंभर टक्के यशस्वी झाला. रहदारीच्या व गजबजलेल्या रस्त्यांवर शुक्रवार असूनही शुकशुकाट होता. सकाळपासून दुपारी चारपर्यंत शांततेत बंद सुरु होता. बसस्थानकासमोर सहारा हाॅस्पीटलनजीक चहा टपरी सुरु असल्याचे काही तरुणांच्या नजरेस पडले. त्यांनी येथे दगडफेक केली. पोलिस घटनास्थळी येत असतानाच या जमावाने अप्सरा हॉटेलनजीक व बसस्थानक परिसरात दगडफेक केली.

हेही वाचा: नाशिक जिल्हा बँकेत पोलिस आयुक्तांची ‘एन्ट्री’

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमाव व पोलिस समोरासमोर आले. जमावातील आक्रमक तरुणांनी पोलिसांच्या दिशेनेही दगड भिरकावले. या घटनेनंतर शहरात सर्वत्र अफवांचे पेव फुटले. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बंदमध्ये हॉकर्स युनियन, रिक्षा युनियन, भाजी बाजार, टॅक्सी युनियन, ट्रान्सपोर्ट युनियन, मुस्तफा बाजार युनियन, अब्दुल खालीद सब्जी मार्केट, अश्रफ अकॅडमी, दारुल उलूम अश्रफीया, सुन्नी दावत इस्लामी, मालेगाव पॉवरलुम कन्झुमर असोसिएशन, बुनकर असोसिशन सहभागी झाले होते.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात सुरत-चेन्नई महामार्गासाठी ९९६ हेक्टर भूसंपादन

loading image
go to top