अण्णांनी उधळला भाजपचा डाव; मला काय लढायला लावता तुम्हीच लढा की, पत्रातून खडसावलं

मार्तंड बुचुडे
Friday, 28 August 2020

आपण दिल्लीत येऊन दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवावा. मात्र, मी एक फकीर माणूस आहे. माझ्याकडे सत्ता, पैसा असे काहीच नाही. देशात तुमच्या पक्षाचे सरकार आहे.

पारनेर ः दिल्ली भाजपने आप सरकारविरोधात आंदोलन करण्याची गळ घातली होती. परंतु अण्णांनी भाजपचा हा डाव उधळला आहे. उलट टपाली त्यांना खडसावले आहे.

देशात आपल्या पक्षाचे सहा वर्षापासून सरकार आहे. आपल्या पक्षात सर्वाधिक युवक व सदस्य आहेत असा आपल्या पाक्षाचा दावा आहे. युवा शक्ती ही एक राष्ट्रशक्ती आहे. असे असतानाही आपण माझ्यासारख्या एका छोट्या खोलीत राहाणा-या 83 वर्षांच्या फकिर माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहात. ही सर्वात मोठी दुर्भाग्याची बाब आहे, असे खडसावणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज (ता. 28 ) दिल्लीचे  भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांना पाठवले आहे.

हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, आपण मला 24 ऑगस्टला पाठविलेले पत्र मीडियाच्या माध्यमातून समजले. पत्रात आपण लिहले आहे की, आपण दिल्लीत येऊन दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवावा. मात्र, मी एक फकीर माणूस आहे. माझ्याकडे सत्ता, पैसा असे काहीच नाही.  

देशात तुमच्या पक्षाचे सरकार आहे. पंतप्रधान नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पाऊले उचलणार असे म्हणातात, मग दिल्ली सरकारमध्ये जर मोठ्या प्रमाणात भष्टाचार सुरू आहे. केंद्रात आपल्याच पक्षाचे सरकार आहे. मग केंद्र सरकार दिल्ली सरकारच्या विरोधात कठोर करवाई का करत नाही, असा सवाल हजारे यांनी पत्रातून विचारला आहे. 

याचा अर्थ भ्रष्टाचार निर्मुलनाच्या केंद्र सरकारचे सर्व घोषणा ह्या फसव्या आहेत का. मी 83 वर्षात देशाच्या व राष्ट्राच्या हितासाठी काम करीत आहे. 22 वर्ष अहिंसेंच्या मार्गाने आंदोलने केली. 20 वेळा उपोषण केले. अनेक मंत्री व अधिकारी यांना आपल्या पदावरून घरी घालविले. मी कधीही पक्षाचा विचार केला नाही किंवा पक्षाच्या विरोधात आंदोलने केली नाहीत. मला कोणत्याही पक्षाचे काहीच देणे घेणे नाही. मी फक्त देश  व समाजाच्या हिताचा विचार करत असतो.

ज्या ज्या वेळी मी आंदोलने केली त्या त्या वेळी सत्तेत असणा-या पक्षाने माझा संबध विरोधी पक्षाशी सातत्याने जोडला आहे. माझ्या 2011 सालच्या आंदोलन प्रसंगी देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्चार वाढला होता म्हणून मी आंदोलन केले. त्यावेळी जनताही त्रासली होती. लोकांना लक्षात आले की हजारे आपल्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यामुळे जनता माझ्या आंदोलनात सामिल झाली.

2014 ला आपला पक्ष सत्तेत आला, तो केवळ जनतेला भष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न आपण दाखवून सत्तेत आलात. आताही मात्र भष्टाचारात व जनतेच्या त्रासात काहीच फरक पडला नाही. सर्वाना दुस-या च्या पक्षाचे  दोष दिसतात. मात्र, स्वतःच्या पक्षातील दोषही पहावयास शिकले पाहिजे.  

सध्याच्या स्थितीत कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देईल असे मला वाटत नाही कारण प्रत्येक पक्षाचे सत्ता व सत्तेतून पैसा असे समीकरण आहे. त्यासाठी पक्ष बदलून चालणार नाही तर व्यवस्था बदलणे काळाची गरज आहे. मी दिल्लीत येऊन काहीच फरक पडणार नाही. त्या साठी व्यवस्था बदलण्याची आमचा प्रयत्न आहे,असेही शेवटी हजारे यांनी गुप्ता यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare's letter to Delhi BJP