भाजपचे आणखी नगरसेवक संपर्कात, आमदार जगताप यांच्या गौप्यस्फोटाने शिवसेनाच सावध

अशोक निंबाळकर
Saturday, 26 September 2020

निवडीनंतर कटुता येण्याऐवजी खेळीमेळीचे वातावरण तयार झाले. परंतु शिवसेनेच्या अधिकृत पेजवर या निवडीविषयी काहीशी नाराजी होती. आमदार जगताप यांच्याशी जुळवून घेतल्याने काही जणांची खदखद बाहेर आली. राज्यपातळीवरून झाल्याचा मेसेज गेल्याने कोणी फारसे रिअॅक्ट झाले नाही.

नगर ः अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीसाठी अवकाश असला तरी राजकारण चांगलेच तापू लागले आहे. सध्या पावसाळी वातावरण असले तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी मास्टरस्ट्रोक खेळला.

भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार मनोज कोतकर यांचा त्यांनी रातोरात राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. तसेच त्यांना सभापतिपदावर विराजमानही केले. शिवसेनेने या पदासाठी फिल्डिंग लावली होती. परंतु त्यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली. आगामी महापौरपदावर डोळा ठेवत त्यांनी दोन पाऊल मागे सरकणे पसंत केले. नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले मंत्री शंकरराव गडाख यानी शिवसेनेतील गटबाजी संपवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.

निवडीनंतर कटुता येण्याऐवजी खेळीमेळीचे वातावरण तयार झाले. परंतु शिवसेनेच्या अधिकृत पेजवर या निवडीविषयी काहीशी नाराजी होती. आमदार जगताप यांच्याशी जुळवून घेतल्याने काही जणांची खदखद बाहेर आली. राज्यपातळीवरून झाल्याचा मेसेज गेल्याने कोणी फारसे रिअॅक्ट झाले नाही.

भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर ऐनवेळी राष्ट्रवादी आले तसे आणखीही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असे आमदार जगताप म्हणाले. त्यांच्या विधानाने सर्वच सावध झाले आहेत. जगताप यांनी नुस्ता आवाज दिला तरी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत येतील, अशी स्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे नगरसेवक शिवसेनेत गेले होते. त्यामुळे ते माघारी फिरणे फार मुश्कील नाही.

शिवसेनेने आगामी महापौरपदासाठी स्थायी समिती सभापतिपदाचा त्याग केला, असे मानले जात असले तरी जगताप यांच्या आजच्या वक्तव्यामुळे ते सावध झाले आहेत. कारण सध्या महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे २३ नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांचा महाविकास आघाडीच्या माध्यमातून या पदावर दावा आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे संख्याबळ १९ झाले आहे. अजून काही नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे संख्याबळ शिवसेनेच्या पुढे जाऊ शकते. तसे झाल्यास नगरचे समीकरण बदलू शकते, असे आडाखे बांधले जात आहेत.

आमदार जगताप यांच्या भाजप नगरसेवकांबद्दलच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा वार भाजपवर आणि शिवसेना घायाळ झाली आहे. राजकीय विश्लेषकांचेही आगामी निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

 

भारतीय जनता पक्षाचा कोणताच नगरसेवक फुटण्यासारखा नाही. आमदारांनी काय स्टेटमेंट दिले ते मला माहिती नाही. परंतु मनोज कोतकर यांच्याबाबतची घटना प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घातली आहे. पुढील आठवड्यात ते नगर दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी काय घडेल ते तुम्हाला दिसेलच.

- भैया गंधे, शहर जिल्हाध्यक्ष भाजप.

 

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विकासकामांमुळे कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा पक्षप्रवेशासाठी आग्रह आहेत. भाजपतील नगरसेवकही संपर्कात आहेत. भविष्यात त्यांंचाही राष्ट्रवादी प्रवेश होईल.

- संग्राम जगताप, आमदार, नगर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another BJP corporator in touch, MLA Jagtap's secret blast