esakal | 'होय, विधानसभा निवडणूक लढणार' - अनुराधा नागवडे
sakal

बोलून बातमी शोधा

Anuradha nagwade

'होय, विधानसभा निवडणूक लढणार' - अनुराधा नागवडे

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. नगर) : विधानसभा निवडणूक लढवावी, याबाबत ज्येष्ठ मंडळी, महिला व तरुणांकडून सतत मागणी होत आहे. बापूंसोबतच ज्येष्ठ नेते शरद पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आशीर्वादावर नशीब अजमावणार आहे. कुणाला हरविण्यासाठी नव्हे, तर सामान्यांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी विधानसभा लढणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी केली. (Anuradha Nagwade announced that she will fight in the assembly election)

‘सकाळ'शी बोलताना त्या म्हणाल्या, की त्यागाचे दुसरे नाव शिवाजीराव नागवडे (बापू) यांच्या कुटुंबात आता तरी आमदार व्हावा, ही समाजाची इच्छा आहे. श्रीगोंदे तालुक्यासह मतदारसंघात मोठी अस्थिरता आली आहे. लोकांच्या विकासासाठी कुणीही प्रयत्न करीत नसल्याने लोकांचा आधार तुटतोय. लोकांचे हित असले तर ते लोकाभिमुख राजकारण ठरते. शरद पवार, नितीन गडकरी, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे राजकारणी असल्याने राज्य ताठ मानेने उभे आहे. याच तोडीचे राजकारण 'बापूं'नी केले. तालुक्यातही बापू, कुंडलिकराव जगताप, सदाशिवअण्णा पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर या दिवंगत व्यक्तींनी समाजाचे हित पाहत राजकारण केले. त्यांच्या जाण्याने सगळे अस्थिर दिसतेय.

विधानसभेला नागवडे उभे राहणार, अशी चर्चा असते, प्रत्यक्षात उलटेच घडते. या वेळी काय होईल, यावर अनुराधा नागवडे म्हणाल्या, की बरोबर आहे, पण तो भूतकाळ होता. बापूंनी कायम त्यागाची भूमिका ठेवली. दोन वेळा संधी आली, पण आम्ही मनाचा मोठेपणा दाखविला. बापू असताना त्यांच्या कुटुंबातील आमदार व्हावा, ही समाजाची इच्छा अपुरी राहिली. आता त्यांना श्रद्धांजली म्हणून नागवडे घरातील आमदार करण्यासाठी सामान्यांचे खूप दडपण आहे. तो आदर ठेवून या वेळी आमदारकी ताकदीनिशी लढणार आहोत. तालुक्यात बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षण हा खरा विकास अजून बाकी आहे. तो करण्यासाठी एकदाच आमदार व्हायचे असल्याचे अनुराधा नागवडे म्हणाल्या.

हेही वाचा: भंडारदरा ८३, तर मुळा ५८ टक्के भरले!

काँग्रेस आघाडीकडूनच लढणार

अनुराधा नागवडे म्हणाल्या, की शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली

आपले काम सुरू आहे. विधानसभाही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढू. जागा कुठल्या पक्षाला सोडायची, याचा निर्णय ते घेतील. उमेदवारी आघाडीचीच करणार, हे निश्चित आहे.

बापूंना श्रद्धांजली, कारखाना बिनविरोध करा

नागवडे कारखान्याची निवडणूक होत आहे. 'बापूं'नी आयुष्यभर संघर्ष करीत शेतकऱ्यांचे हित पाहिले. त्या महान व्यक्तीसाठी निवडणूक बिनविरोध करावी. जिल्ह्यात इतर कारखाने बिनविरोध झाले, हाही व्हावा. कारभाराबाबत कुणाला शंका असेल, तर बसून चर्चा करावी.

- अनुराधा नागवडे, सदस्य, जिल्हा परिषद

हेही वाचा: नगर : 3 तालुक्‍यांनी ओलांडली कोरोना रुग्णसंख्येची शंभरी

loading image
go to top