नगर जिल्हा बँकेसाठी जामखेडमधून जगन्नाथ राळेभात यांचा अर्ज

वसंत सानप
Thursday, 21 January 2021

राळेभात हे बँकेच्या विद्यमान संचालक मंडळातील माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलमधील ज्येष्ठ संचालक आहेत.

जामखेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राळेभात हे एक अपवाद वगळता मागील चार पंचवार्षिक निवडणुकांमधून तेवीस वर्षांपासून बँकेचे संचालक राहिलेत. त्यांची सहकाराच्या राजकारणावर मजबूत पकड आहे.

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी जामखेड तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात यांनी गुरुवार (ता.21) रोजी नगर येथे जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. 

हेही वाचा - मेरे पास बाप है आपके पास क्या है

यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री राम शिंदे, माजी संचालक पाडूरंग पाटील सोले, तुषार पवार, अंकुश ढवळे, किसन ढवळे, डॉ. अविनाश पवार, सुधीर राळेभात आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राळेभात हे बँकेच्या विद्यमान संचालक मंडळातील माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलमधील ज्येष्ठ संचालक आहेत. यावेळी पुन्हा त्यांनीच उमेदवारी केली आहे. तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांवर त्यांची मजबूत पकड आहे. 

यावेळी त्यांच्या विरुद्ध तालुक्यातील उमेदवारीसाठी अद्यापि एकही नाव चर्चेत नाही. त्यामुळे यावेळी राळेभात हे बँकेचे 'बिनविरोध' संचालक होतील असे चित्र आहे. यापूर्वी एकदा राळेभात हे बिनविरोध संचालक झाले होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Application of Ralebhat from Jamkhed for Nagar District Bank