
मुंबई येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुस्लीम समाजासाठी दहा टक्के आरक्षण मंजूर करा.
नेवासे (अहमदनगर) : मुंबई येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुस्लीम समाजासाठी दहा टक्के आरक्षण मंजूर करा, अशी मागणी नेवासे येथील मुस्लीम समाजाचे युवा नेते इम्रान दारुवाले यांनी केली आहे. दरम्यान या मागणीचे निवेदनही त्यांनी नेवासे तहसीलदारांना दिले आहे.
युवा नेते इम्रान दारुवाले यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाकडून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आलेल्या निवेदनात, महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आणि आर्थिक स्थिती पाहता समाजास संविधानिक कायदा करून दहा टक्के आरक्षण देण्यात यावे. मुस्लिम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
२०२० पासून पुढे होणाऱ्या सर्व नोकरी मध्ये दहा टक्के जागा मुस्लीम समाजासाठी राखीव ठेवाव्यात. मुस्लिमांवर होणारे हल्ले, मॉबलिंचीगच्या अपशब्द यांना आळा घालण्यासाठी मुस्लीम समाजाला अँट्रासीटी कायदयाअंतर्गत संरक्षण देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. १४ ते १५ डिसेंबरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा योग्य न्याय न मिळाल्यास समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी जाकिर शेख, अल्ताफ पठाण, शरीफ शेख, जावेद शेख, अब्बास बागवान, अनिल यादव, जब्बार पिंजारी, फारूक शेख, वसंत दौंड, राजू इनामदार, रियाज़ पठाण, नासिर इनामदार, जावेद मन्सूरी, शरीफ शेख, सरदार देशमुख आदी उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर