नगरपाठोपाठ अकोले ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्याची अॉडिओ क्लिप व्हायरल

शांताराम काळे
Saturday, 14 November 2020

सदरची घटना नेमकी कधीची आहे याचा या क्लिपमधून उलगडा होत नाही, पण घटनाक्रमावरुन गेल्या दोन-चार दिवसांतीलच ही घटना असल्याचे अगदी सुस्पष्ट आहे

अकोले : जिल्हा पोलीस दलाची अॉडिओ क्लिपमुळे नाचक्की होत आहे. खात्यातील भ्रष्टाचारामुळे काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही झाल्या होत्या. हे प्रकरण निवळत नाही तोच अकोले पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याची क्लिप व्हायरल झाली आहे. 

डिझेल प्रकरणापासून सुरु झालेला भ्रष्टाचाराचा हा प्रवास श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर असा प्रवास करीत आता अकोले-राजूरच्या हद्दीत पोहोचला आहे. गोवंशाच्या मांसची वाहतूक आणि अकोले तालुक्यातील वाळु तस्करी यात अकोल्याचे पोलीस अधिकारी यांचा थेट संबंध दर्शविणारा धक्कादायक प्रकार एका ऑडिओ क्लिपद्वारा समोर आला आहे.

 खात्यातीलच ‘कलेक्टर’ म्हणून ओळखल्या जाणार्याा पोलीस कर्मचार्याच्याच मुखातून अकोले पोलीस ठाण्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे वर्णन पोखरलेल्या व्यवस्थेचे धिंदवडे काढणारे आहे. 

काही दिवसांपूर्वीच अकोले पोलीस ठाण्यातील आवारात जप्त केलेल्या वाळु वाहनाचे टायर चोरी होण्याची घटना समोर आली होती. अकोले पोलीस ठाण्यातील सरकारी वाहनाचा चालक चंद्रकांत सदाकाळ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. यातही अकोल्याचे पोलीस अधिकाऱ्याचा हात गुंतलेला दिसून येतो. त्याचा ‘वसुली’ करणारा पोलीस कर्मचारी कसा आपल्याच मुखातून या हप्तेखोरीत अकोले पोलीस ठाण्यातील वरीष्ठ अधिकार्याीपासून ते पोलीस शिपाईपर्यंतचे अनेकजण गुंतले आहेत, हेच जणू ठळकपणे सांगतोय, त्यावर अकोल्यातील ‘त्या’ वाळूतस्कराने विश्वासार्हतेची मोहोरच लावली.

सदरची घटना नेमकी कधीची आहे याचा या क्लिपमधून उलगडा होत नाही, पण घटनाक्रमावरुन गेल्या दोन-चार दिवसांतीलच ही घटना असल्याचे अगदी सुस्पष्ट आहे. कोणीतरी अज्ञाताने एका टेम्पोतून बेकायदा गोवंशाचे मांस वाहून नेले जात असल्याची तक्रार नगरच्या नियंत्रण कक्षात केली. त्यानुसार नियंत्रण कक्षातून अकोले पोलीस ठाण्याला त्याबाबत कळविण्यात आले व केलेल्या कारवाईचा अहवालही देण्यास सांगण्यास ले. कर्तव्याप्रमाणे ठाणे प्रमुखाने सरकारी वाहनाला कॉल देवून सदरची माहिती देत कारवाई करण्यास सांगीतले.

सरकारी वाहनातील चालक चंद्रकांत सदाकाळसह गोराणे, खुळे व आगलावे आदी कर्मचाऱ्यांनी घोटीच्या दिशेने पाठलाग करुन ‘ते’ संशयीत वाहन अडविले. त्या दरम्यान संबंधित टेम्पोच्या चालकाने अकोले पोलीस ठाण्याचा ‘वसुली’ कर्मचाऱ्याला  फोन करुन पाठलाग सुरू असल्याचे सांगितले. त्या वसुली कर्मचाऱ्यानेही तत्परता दाखवित थेट पोलीस निरीक्षकांनाच ही बाब कळविली.

आपल्या व्यवहारात हा कोण अडथळा आणणारा अशा अविर्भावात त्यांनी लागलीच सरकारी वाहनाचा चालक सदाकाळ याला फोन करीत त्याला चांगलेच फैलावर घेतले.

असे आहे फोनवरील संभाषण

‘काऽरे.. आता तुम्ही निर्णय घेणार आहात का?’ असे म्हणत ‘उद्या काही उलट-सुलट’ झालं तर मी तुला वाचवणार नाही’ असे म्हणत धाकात घेण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने ‘मग काय करु सर? असं विचारताच पोलीस निरीक्षक जोंधळे यांनी ‘सोडून दे ते वाहन’ असे फर्मानच सोडीत, ‘कंट्रोलला काहीच आढळून आले नसल्याचे कळविण्यासही सांगितले. दिवाळीत हे उद्योग करायचे का? असा आश्चर्यकारक प्रतिसवालही उपस्थित केला. त्यावर चालकाने होकारार्थी प्रतिसाद देत फोन बंद केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Audio clip of a police officer from Akole police station goes viral