esakal | संपलेलो नाही; ‘झेडपी’सह विधानसभाही लढू! राष्ट्रवादीपुढचा पेच वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

babasaheb bhos

संपलेलो नाही; ‘झेडपी’सह विधानसभाही लढू!

sakal_logo
By
संजय काटे

श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : ‘‘तालुक्यासोबतच जिल्ह्याच्या राजकारणात येऊन ४२ वर्षे झाली. आपले वय झाले. आता निवडणूक लढणार नाही या भ्रमात काही नेते आहेत. तथापि, आपण राजकारणातून अजूनही संपलेलो नाही, हे दाखविण्यासाठी जिल्हा परिषदेनंतर विधानसभाही लढविणार आहोत,’’ असा इशारा देत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी राष्ट्रवादीपुढचा पेच वाढविला आहे. (Babasaheb-Bhose-warns-contest-assembly-elections-marathi-news-jpd93)

‘सकाळ’शी बोलताना भोस म्हणाले, ‘‘सलग २९ वर्षे जिल्हा परिषद सदस्य राहिलो. अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर काम केले. त्यातून मांडवगण जिल्हा परिषद गटासोबतच तालुक्याच्या विकासाला हातभार लावला. विधानसभाही लढलो. मात्र यश आले नाही. त्याची कारणे वेगवेगळी असली, तरी दर वेळी सामान्य जनता आपल्यासोबत राहिली.’’

हेही वाचा: आमदार-पोलिस निरीक्षकांत खडाजंगी; बैठक सोडून जाण्याची सूचना

आपली लढाई कुणा व्यक्तिविरोधात नसून, गटातील विकासासाठी आहे

‘‘गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत स्नुषा गौरी भोस हिला मांडवगण जिल्हा परिषद गटातून भाजपची उमेदवारी होती. लोक शेवटपर्यंत आपल्यासोबत राहिले. मात्र, निकालावेळी नेमके काय झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला कुणालाही दोष द्यायचा नाही. जय-पराजय मान्य करावा लागतो. कारणे देऊन काही उपयोग नाही,’’ असे ते म्हणाले.

‘‘तालुक्याचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांच्या निधनानंतर आपण त्यांच्या जागी राहत राजेंद्र नागवडे व राहुल जगताप यांच्या पाठीशी राहिलो. या दोघांनी एकत्र राजकारण करावे, हे आपले मत आजही कायम आहे. त्यांची वैयक्तिक अडचण अथवा पक्षाची काही धोरणे वेगळी असली, तरी आपण त्यासाठी प्रयत्न करू. मात्र, आता आपल्यालाच बेदखल करण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने, माझ्या हितचिंतकांसाठी पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे. मांडवगण जिल्हा परिषद गटातून यावेळी आपण स्वत: लढणार आहोत. समोर कोण आहे, याचा विचार कधीच केला नाही; याही वेळी करणार नाही. आपली लढाई कुणा व्यक्तिविरोधात नसून, गटातील विकासासाठी आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: शनिमंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अखेर शनिचा प्रकोप

आपण राष्ट्रवादीतच - भोस

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांशी बांधील असल्याने राष्ट्रवादीत आहोत. जिल्हा परिषदेला डावलण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. तसे झाल्यास विधानसभेचीही तयारी करून ताकद दाखवू. शेवटपर्यंत लढण्याची जिद्द आहे. लोक आपल्याशी प्रामाणिक आहेत. समोर भाजप आहे की काँग्रेस, याचा विचार करणार नाही, हे नेत्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही भोस यांनी दिला.

loading image