सावेडीतील रस्तेच चुकले वाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

महापालिकेच्या तीन कोटी 48 लाखांच्या विकास आराखड्यातून तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग महाल रस्त्याचे काम सुरू झाले. सावेडी उपनगरातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, लॉकडाउनमुळे या रस्त्याचे काम थांबले.

नगर : महापालिकेच्या तीन कोटी 48 लाखांच्या विकास आराखड्यातून तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग महाल रस्त्याचे काम सुरू झाले. सावेडी उपनगरातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, लॉकडाउनमुळे या रस्त्याचे काम थांबले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तपोवन रस्त्याचे काम मुळातच निकृष्ट झाले. या रस्त्यावर टाकलेली खडी खचल्याने रस्त्यात पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक या रस्त्याने जाण्या-येण्याचे टाळतात. म्हणून सावेडीतील हे दोन रस्तेच वाट चुकल्यासारखे वाटतात. 

तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग महाल रस्त्याचे दुभाजक तुटले असून, गोकुळनगर परिसरात हा रस्ता खराब झाला आहे. ठेकेदाराला नोव्हेंबरपूर्वीच कार्यारंभ आदेश दिला होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. त्यातील काही अतिक्रमणे काढली आहेत. तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग चौकापर्यंत डांबरीकरण, तर भिस्तबाग चौकापासून महालापर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे. 
रस्त्याची मोजणी करून रस्त्यातील अतिक्रमणे हटविणे, रस्त्यातील मोठे वृक्ष, खांब हटविण्याबाबत संबंधित विभागांतर्फे कार्यवाही सुरू झाली होती. या कामामुळे तपोवन, वडगाव गुप्ता रस्ता, ढवणवस्ती आदी भागांतील नागरिकांना सावेडी उपनगरात येण्यासाठी चांगला रस्ता मिळणार आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन झाले आणि या रस्त्याचे काम ठप्प झाले. महापालिकेच्या बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले असले, तरी काम मात्र अजूनही सुरू झालेले नाही. 

तपोवन रस्त्याचेही काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, ते अर्धवट राहिले. या रस्त्यावर खडी अंथरण्यात आली होती. पण संबंधित ठेकेदाराने या रस्त्याचे काम सुमार दर्जाचे केले. त्यामुळे रस्त्यावरील खडी उखडली आहे. त्यावर टाकलेला मुरूम उघडा झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. साइडपट्ट्यांवर माती आल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खराब रस्ता आणि धुळीमुळे त्या परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढण्याची शक्‍यता आहे. 
 
अशी असेल रस्त्याची रुंदी 
टीव्ही सेंटर ते गुलमोहर रस्ता कोपरा - 20 मीटर 
गुलमोहर रस्ता कोपरा ते भिस्तबाग चौक - 18 मीटर 
भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महाल - 15 मीटर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad condition of road in Sawedi