
संगमनेर : मोठा संघर्ष करून प्रवरेचे हक्काचे तीस टक्के पाणी संगमनेर, अकोले तालुक्याला मिळवले. पुढे शेतकऱ्यांनी सहकारी तत्त्वावर तालुक्यात पाईपलाईनचे जाळे निर्माण करून पिके उभे केली. त्यातून सहकारी साखर कारखाना व आर्थिक समृद्धता निर्माण झाली. आपण निळवंडे धरण व कालव्यासाठी रात्रंदिवस काम केले. कोणतेही काम एका दिवसात होत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. उभे केलेले हे रचनात्मक काम व सहकार प्रत्येकाला जपावा लागणार आहे. मनभेद करणारे येतील. मात्र, त्यांना वेळीच रोखून आपला तालुका व सहकार जपा, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.