ब्रिटिशकालीन वटवृक्ष स्वातंत्र्याचे साक्षीदार

नेहरू, इंदिराजींनीही अनुभवले वृक्षसौंदर्य
Banyan tree is a witness of British independence Nehru Indiraji also experienced beauty of trees
Banyan tree is a witness of British independence Nehru Indiraji also experienced beauty of trees

शिर्डी - रस्त्याच्या दुतर्फा वयाची शंभरी पार केलेल्या महाकाय वटवृक्षांची दाटी हे लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहाचे वैभव आहे. ब्रिटिशांनी लावलेल्या या वटवृक्षांच्या सौंदर्याची अनुभूती स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि ‘आयर्न लेडी’ अशी ओळख असलेल्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली. आता भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे साक्षीदार होण्याचे भाग्य या वृक्षांना लाभते आहे.

उंचच उंच विशाल फांद्यांवरून खाली येत जमिनीत रुजलेल्या पारंब्यांचा संभार हा प्रथमदर्शनी एका रांगेत ध्यान लावून तपश्चर्येला बसलेल्या जटाधारी साधूंसारखा दिसतो. घनदाट अरण्यात प्रवास केल्याचा भास पारंब्यांच्या सहवासामुळे होतो. एकशे बारा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात या महावृक्षाचा चोहोबाजूने विस्तार झाला. दोन्ही हातांच्या कवेत घेता येणार नाहीत एवढ्या जाडीच्या पारंब्यांनी मूळ वृक्षाभोवती आपला संसार थाटला. त्यांच्या पाच-सात पिढ्यांच्या विस्तार येथे सहज नजरेस येतो.

हे वृक्ष चिरंजीवी समजले जातात. कारण, फांद्यांवरून खाली झेपावणाऱ्या पारंब्या जमिनीत रुजल्या, की त्यापासून नव्या वृक्षांची उत्पत्ती होते. नवनिर्मितीची प्रक्रिया अखंडपणे सुरू असते, याची प्रचिती या वृक्षांकडे पाहिली की येते. गेल्या कित्येक वर्षांत त्यांनी व्यापलेल्या जमिनीने सूर्याची किरणे पाहिलेली नाहीत. घनदाट जंगलात प्रवास केल्याची अनुभूती या वटवृक्षांच्या सहवासात मिळते. ब्रिटिशांनी १९२६ च्या सुमारास भंडारदरा धरणाची उभारणी पूर्ण केली. त्यापूर्वी दहा वर्षे आधी त्यांनी हे विश्रामगृह बांधले आणि रस्त्याच्या दुतर्फा वटवृक्ष लावले.

धरण उभारणीच्या काळात ब्रिटीश अधिकारी येथे मुक्काम आणि विश्रांतीसाठी येत. धरणात पाणी साठले त्या काळात स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे वारे आकार घेऊ लागले. हे आंदोलन आणि स्वातंत्र्यानंतरचा काळदेखील या वृक्षांनी अनुभवला. ब्रिटिशांनी उभारलेल्या भंडारदऱ्याच्या पाण्यावर अकोले, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यात साखर कारखानदारी, म्हणजेच समृद्धीची उभारणी झाली. सहकारी साखर कारखानदारीचे जनक डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, अर्थतज्ज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता या दिग्गजांचा वावरही या वृक्षांनी अनुभवला. सहकारी साखर कारखानदारीतून उदयाला आलेली मातब्बर राजकीय घराणी राज्यकर्ती झाली. हे स्थित्यंतरही या महावृक्षांनी पाहिले.

काळाच्या ओघात जलसंपदा विभागाची ब्रिटिशकालीन शिस्त आणि वैभव लोप पावले. विश्रामगृहांची हेळसांड आणि उपेक्षा सुरू झाली. त्याभोवतालची कलात्मकता आणि फुलझाडांचे सौंदर्य केव्हाच लुप्त झाले. भाग्य एवढेच, शंभरी पार केलेले हे वैभवशाली वटवृक्ष अद्याप टिकून आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com