
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी परिवाराच्यावतीने मंगळवारी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या ट्रॅक्टर रॅलीवेळी उपस्थित राहणार आहेत.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी परिवाराच्यावतीने मंगळवारी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या ट्रॅक्टर रॅलीवेळी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती राळेगणसिद्धीच्या माजी सरपंच जयसिंग मापारी आणि माजी उपसरपंच लाभेष औटी यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
प्रजासत्ताक दिनानिमीत्त मंगळवारी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, श्री.संत निळोबाराय विद्यालय तसेच डीबीएम इंग्लिश मिडियम स्कूल येथे ध्वजारोहणाचे कार्यक्रम हजारे यांच्या उपस्थित होणार आहेत. त्यानंतर श्री. संत यादवबाबा मंदिर ते पारनेर तहसिल कार्यालय अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. याआधी हजारे यांनी दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर २०२० रोजी पद्मावती मंदिर परिसरात महात्मा गांधी पुतळ्याशेजारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. देशातील सर्व शेतकरी व जनतेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन हजारे यांनी केले होते. शेतक-यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, यासाठी देशभरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे.
शेवगावमध्ये मावा विक्री करणा-या सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले
स्वामिनाथ आयोगानुसार शेतीमालाला हमीभाव मिळावा, केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तत्ता मिळावी, यासाठी हजारे यांनी (ता. ३०) जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या लेखी आश्वासनांची पुर्तता केंद्र सरकारने करावी, ही हजारे यांची मागणी आहे. दोन्ही आंदोलनात शेतक-यांच्या शेतीमाला हमीभाव मिळावा, ही प्रमुख मागणी असल्याने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला व हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धी परिवाराच्यावतीने ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असल्याचे मापारी व औटी यांनी सांगितले.