Breaking: अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडला, श्रीरामपूरसह बेलापूरात बंद

Belapur
Belapur

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह येथील वाकडी रस्त्यावरील रेल्वे मार्गासमोरील यशवंतबाबा चौकी परिसरात रविवारी (ता.७) सकाळी आढळून आला. बेलापूर बायपास परिसरातून व्यापारी गौतम झुबरलाल हिरण यांचे सोमवारी (ता.१) अपहरण झाले होते. पोलीस तपास सुरु असतांना आज सातव्या दिवशी त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने श्रीरामपूर शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली.

श्रीरामपूर- वाकडी रस्त्याच्या कडेला यशवंतबाबा चौकी परिसरात सकाळी आढळून आलेल्या मृतदेहाची माहिती प्रवाशांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर प्रारंभी मृतदेहाची ओळख पटत नव्हती. परंतु हिरण कुटुंबीय घटनास्थळी गेल्यानंतर कपडे आणि खिशातील कागदपत्रानुसार मृतदेहाची ओळख पटली.

व्यापारी हिरण यांचे बेलापूर बायपास समोरुन सोमवारी (ता. १) सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपहरण झाल्याच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बेलापूर बुद्रूक आणि बेलापूर खुर्दमध्ये व्यापारी हिरण यांच्या अपहरणाच्या निषेधार्थ शनिवारी (ता.६) बंद ठेवण्यात आला होता. बेलापूर ग्रामस्थांनी बैठक घेऊन गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेत हिरण यांची माहीती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार लहू कानडे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन बेलापूरातील व्यापारी हिरण यांच्या अपहरणाचा सवाल उपस्थित केला होता. पोलीस प्रशासनाने व्यापारी हिरण यांच्या शोधासाठी विशेष तपास पथके रवाने केली होती. त्यानंतर आज सकाळी कुजलेल्या अवस्थेत मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औरंगाबाद येथे पाठविण्यात आला.

व्यापारी हिरण यांच्या मारेकऱ्यांना तातडीने गडाआड करण्याची मागणी बेलापूर ग्रामस्थांनी केली आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरासह बेलापूरातील व्यापारी वर्गाने बंद बाजारपेठ ठेवून हिरण यांचा श्रद्धाजंली अर्पण केली. येथील व्यापारी वर्गाने शहर परिसरात फेरफटका मारुन दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. तसेच येथील रेल्वे स्थानक समोरील हनुमान मंदिरात व्यापारी वर्गाने बैठक घेऊन शोक व्यक्त केला.

पोलिस पथकाचा तपास योग्य दिशेने सुरु असून तपासादरम्यान, पोलिसांनी घाई केल्यास व्यापारी हिरण यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे आता घाबरण्याचे कारण नाही. तपास योग्य दिशेने सुरु असून संबधीत आरोपींना पोलीस लवकरच अटक करणार आहे. सदर प्रकरणात आपण स्वतःहून लक्ष घातले असून व्यापारी वर्गाने घाबरण्याचे काही कारण नाही. पोलीस तपास करीत असून सर्वांनी शातंता राखण्याचे, आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

- राज्यभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com