राळेगणसिद्धीत अण्णांनी उभारलं भारतरत्न आंबेडकर सामाजिक भवन

एकनाथ भालेकर
Monday, 26 October 2020

राळेगणसिद्धी येथे आज विजयादशमी व दसरा सणाच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

राळेगणसिद्धी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारत देशाला एकसंध व एकत्र बांधण्याचे महान कार्य केले आहे. भारत देशात अनेक जाती, धर्म, वंश, पंथाचे लोक राहतात. देश स्वतंत्र झाल्यानंतर सत्तरहुन अधिक दशकं झाली आहेत.

आजही देशातील जनता केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे एकत्र आहेत. त्यांनी भारतीय संविधान व घटना लिहिण्याचे काम केले त्यामुळे हे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी सकाळशी बोलताना केले. 

राळेगणसिद्धी येथे आज विजयादशमी व दसरा सणाच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी सरपंच हिराबाई पोटे, माजी उपसरपंच लाभेष औटी, केंद्रीय सेवा व कर विभागाचे उपायुक्त डॉ. गणेश पोटे, उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे,विठ्ठल गाजरे, महेंद्र गायकवाड, माजी सैनिक दादाभाऊ पठारे, शरद मापारी, शाम पठाडे,सुनिल हजारे, रमेश औटी, अरुण पठारे, दादाभाऊ गाजरे, शांताराम जाधव, सुनिल जाधव, एकनाथ गडकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

हजारे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना ही एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नव्हती तर ती सर्वव्यापी आणि परिपूर्ण अशी आहे. त्यांनी घडविलेल्या राज्यघटनेमुळे आपला देशच नाही, तर जगातील अनेक देश अनुकरण करत आहेत. त्यांनी कधीही एका विशिष्ट एका वर्गाचा विचार केला नाही.

सर्वसमावेशक भूमिकेतून त्यांनी राज्यघटनेचा विचार केला. या राज्यघटनेतील मूल्ये व विचार आपण आपल्या जीवनात रुजविली पाहिजे असेही हजारे यावेळी बोलताना म्हणाले. माजी उपसरपंच लाभेष औटी, सुनिल जाधव व ग्रामपंचायत राळेगणसिद्धीच्या सर्वच सदस्यांनी या सामाजिक भवनाच्या कामासाठी परिश्रम घेतल्याबद्दल हजारे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नुसतेच पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात शुद्ध आचार, विचार, त्याग निष्कलंक जीवन, अपमान पचविण्याची ताकद या पंचसूत्रीची सांगड घालत कृतीची जोड दिली. ही सर्व हिंमत त्यांना अभ्यासातूनच प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनी जसे जीवनात वाचनाला महत्त्व दिले तसेच आपणही दिले पाहिजे.

 

कोरोना संसर्गजन्य रोगाचे संकट असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे आज विजयादशमीच्या मुहूर्तावर औपचारिक उद्घाटन करण्यात आले आहे. कोरोना संसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले व माजी सामाजिक व न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक भवनाचा भव्य असा उदघाटन सोहळा होणार आहे.
- लाभेष औटी, माजी उपसरपंच राळेगणसिद्धी 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Ratna Ambedkar Social Building erected at Ralegan Siddhi