खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यवधी उकळले | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहमदनगर : खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यवधी उकळले

अहमदनगर : खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यवधी उकळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये उकळले, असा आरोप शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी केला आहे. याची चौकशी न झाल्यास सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दहातोंडे यांनी निवेदन पाठविले आहे. मंत्री अशोक चव्हाण यांना मुंबईत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली, तसेच काही पुरावेही दाखल केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, संगमनेरसह अन्य तालुक्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील पाच वर्षांपासून आतापर्यंत केलेल्या कामांची चौकशी करून, कोणत्या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी किती खर्च केला, हे जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: अहमदनगर : सहायक पुरवठा अधिकारी पारनेरचे प्रभारी तहसीलदार

याबाबत दखल न घेतल्यास २६ नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दहातोंडे यांनी दिला आहे. झालेल्या कामाची क्वालिटी कंट्रोलमार्फत, तसेच नगर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रस्त्यांबाबत लवकरच चौकशी

नगर जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे हा चर्चेचा विषय होऊ लागला आहे. खड्डेदुरुस्तीसाठी सरकारकडून निधी दिला जातो. आवश्यक तेथे तातडीने दुरुस्ती करण्याचे नियोजन केले जाते. योग्य पद्धतीने कार्यवाही झाली नसेल, किंवा त्यामध्ये गैरव्यवहाराचे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्याचे दहातोंडे यांनी सांगितले.

loading image
go to top