
सरसकट वाढीव वीजबिल पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना "शॉक' दिला आहे. तिजोरीत पैसा नसताना, केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरू आहेत.
लोणी (अहमदनगर) : "सरसकट वाढीव वीजबिल पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना "शॉक' दिला आहे. तिजोरीत पैसा नसताना, केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरू आहेत. बिघाडी सरकारच्या फसव्या धोरणाचीच होळी रस्त्यावर उतरून करण्याची वेळ आली आहे. घोषणाबाज सरकारचा "फ्यूज'ही आता उडाला आहे,'' अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
वीज वितरण कंपनीने ग्राहकांना दिलेल्या वाढीव बिलांची होळी, तसेच सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रुक येथे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. काशिनाथ विखे, एम. वाय. विखे, किसन विखे, नंदकिशोर राठी, सुभाष विखे, अनिल विखे, लक्ष्मण बनसोडे, अनिल विखे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : उच्च अधिकारीपदावर कार्यरत असणाऱ्या तरुण- तरुणीने केले अवघ्या दोन रुपयांत लग्न
विखे पाटील म्हणाले, ""सरसकट वीजबिलांची वसुली वितरण कंपनीने तातडीने थांबवावी. 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी सरकारकडे कोणीही केली नव्हती. ऊर्जामंत्र्यांनीच स्वत:च्या घोषणेपासून पळ काढला आहे. या घोषणेची पूर्तता करून तातडीने 100 युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचा आग्रह सरकारकडे आम्ही धरणार आहोत. तुमच्या तिजोरीत पैसाच नाही, तर मग घोषणा करता कशाला? काहीही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे, हा सरकारमधील मंत्र्यांचा केवळ अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील जनतेशी केलेल्या विश्वासघातामुळे या सरकारचा फ्यूजच उडाला आहे.''
शाळा सुरू करण्याबाबतही सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नाही. शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयाला राज्यमंत्रीच विरोध करतात. शिक्षकांच्या कोविड चाचण्यांसाठी सुसज्ज यंत्रणा नाही. सरकार पूर्णत: गोंधळले असून, विद्यार्थी, शिक्षक, पालकांमधील संभ्रमावस्था दूर करण्यात त्याला पूर्ण अपयश आल्याची टीका विखे पाटील यांनी केली. लोणी खुर्द येथेही वीजबिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
संपादन : अशोक मुरुमकर