आमदार राम शिंदे यांचे कर्जतमध्ये जंगी स्वागत | Ram Shinde News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Shinde News

आमदार राम शिंदे यांचे कर्जतमध्ये जंगी स्वागत

कर्जत : गेली अडीच वर्षे मतदारसंघात विकास ठप्प झाला होता. मी मंजूर करून आणलेल्या कामांचीच भूमिपूजन आणि उद्‌घाटने होत होती. संत गोदड महाराज मंदिरात प्रवेश करताच आघाडी सरकार कोसळणार असल्याची बातमी आली. आता त्यांच्याच आशीर्वादाने आपले सरकार स्थापन होत पुन्हा एकदा आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार राम शिंदे यांनी दिली.(Ram Shinde News)

येथे विधान परिषदेत आपला विजय साकार केल्यानंतर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे तालुक्यात भाजपकडून भव्य स्वागत झाले. सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेत राम शिंदे कर्जत तालुक्यात दाखल झाले. तालुक्यात शिंदे यांची विविध ठिकाणी विजयी मिरवणूक काढण्यात आली. शिंदेंनीदेखील सर्वसामान्य मतदारांना अभिवादन करीत धन्यवाद दिले.

त्यांनी ग्रामदैवत संत सद्‌गुरू गोदड महाराजांची महाआरती करून दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान सेलचे सुनील यादव, ज्येष्ठ नेते ॲड. शिवाजीराव अनभुले, डॉ. रमेश झरकर, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, नगरसेविका अश्विनी गायकवाड, काका धांडे, पप्पू धोदाड, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, गणेश पालवे, विनोद दळवी, अनिल गदादे, युवा नेते प्रवीण फलके, मनीषा वडे, राणी गदादे, आशा वाघ, दादा सोनमाळी, संजय भैलुमे, दत्ता कदम, शेखर खरमरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृहाजवळून शिंदे यांच्या विजयी मिरवणुकीस सुरवात झाली. महिला पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेत्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरीत आपल्या अडीच वर्षांच्या वनवासाची सांगता केली. यामध्ये आमदार शिंदेही सहभागी झाल्यानंतर मिरवणुकीत उत्साह संचारला. महासती अक्काबाई मंदिरात दर्शन घेत विजयी मिरवणूक शहरात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ईदगाह मैदानात फुलांच्या भव्य हारात राम शिंदेंना गुंफण्यात आले.

असं घडलं...

साठ फुटी पुष्पहार, एकवीस तोफांची सलामी, डीजे आणि पारंपरिक वाद्य, यंत्रामधून गुलालाची उधळण, प्रत्येक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि मनसोक्त नाचून आनंद, जल्लोष करणारे पुरुष आणि महिला कार्यकर्ते हे आजच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांना शिंदे यांनी मिठी मारली. यावेळी पोटरे यांच्या आनंदाश्रूंचा बांध फुटला. त्यावेळी शिंदे यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर यांनी शिंदे यांच्यावर गुलाबपुष्पांची उधळण केली. किसान सेलचे सुनील यादव यांना प्रा. शिंदे यांनी गळ्यातील पुष्पहार घातला.

Web Title: Bjp Mla Ram Shinde Warm Welcome Karjat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top